बेळगाव शहरातील चिकन वेस्ट अर्थात चिकन दुकानातील कोंबड्यांचे टाकाऊ अवयव वगैरे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होत असून चिकन वेस्टचे संकलन व वाहतुकीसाठी चार वाहने तैनात करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे महापालिका आरोग्य विभागावरील ताण कमी होणार आहे.
चिकन वेस्ट संकलन, वाहतूक व त्यावर प्रक्रिया यापैकी कोणतेही काम महापालिकेला करावे लागणार नाही. शहरातील चिकन विक्रेत्यांच्या संघटने कडूनच हे काम केले जाणार असल्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत देखील होणार आहे.
बेळगाव शहरात दररोज 4 ते 5 टन चिकन वेस्ट तयार होते त्याचे संकलन करणे, त्यावर तुरमुरी कचरा डेपोत प्रक्रिया करणे हे काम महापालिकेला करावे लागत होते. शहरातील हॉटेल्स तसेच चिकन विक्री दुकानांमधील कचरा समस्या महापालिकेसाठी डोकेदुखी बनली होती.
याबाबतीत हॉटेल मालक ठोस निर्णय घेत नसल्यामुळे महापालिकेने चिकन विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना चिकन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना केली होती. चिकन विक्रेत्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हुबळी -धारवाड शहराच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला तेथे ज्या कंपनीकडून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे त्या कंपनीलाच बेळगाव प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार संबंधित कंपनीने आपले काम सुरू केले असून चिकन वेस्ट संकलन व वाहतुकीसाठी चार वाहने काल सोमवारी बेळगाव दाखल झाली आहेत.
यापैकी दोन वाहने उत्तर तर दोन वाहने दक्षिण विभागात कार्यरत राहतील. चिकन विक्रेत्या संघटनेच्या माध्यमातूनच चिकन वेस्ट संकलन करून ते प्रकल्पाकडे पाठविले जाणार आहे. चिकन वेस्टवर प्रक्रिया करणारा बेळगाव जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प ठरणार आहे.