Thursday, April 25, 2024

/

बालचमुनी साकारली सिंहगडाची लक्षवेधी प्रतिकृती

 belgaum

दिवाळी सणाची लगबग चालू झाली की, चिमुरड्या पासून ते मोठया मुलांपर्यंत सगळ्यांना आस लागते ती किल्ला बनवण्याची.याला अपवाद नसलेल्या कणबर्गी गावातील चव्हाट गल्ली येथील मुलांनी सिंहगड किल्ल्याची लक्षवेधी प्रतिकृती साकारली आहे.

सिंहगड प्रतिकृती साकारणाऱ्या या मुलांची नावे आकाश चिक्कोर्डे, रोहित गोवेकर, सिद्धार्थ मिरजकर, जैशील कलकुट्री, जयदीप जनाई, निखिल जनाई, ओमकार पुजेरी, जय कोनुचे आणि मयुरेश पाटील अशी आहेत. फक्त किल्ला न बनवता या किल्ल्याची संपूर्ण माहिती ही मुले देतात.

या बाल चमुनी दिलेल्या माहितनुसार सिंहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गडकिल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 कि. मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेत पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवरील या गडाचा दोन पायऱ्या सारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनासाठी उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही हा किल्ला लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो‌. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. कौंदिन्य ऋषींच्या नावावरून कोंढाणा असे नांव या किल्ल्याचे पडले आहे.Kanbargi fort

 belgaum

सिंहगडची लढाई हे स्वराज्याच्या कामासाठी लोक कसे तत्पर राहायचे त्याचे उत्तम उदाहरण आहे. छ. शिवरायांचे बालपणीचे मित्र सेनापती तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न असतानाच महाराजांनी त्यांच्यावर एक महत्त्वाची जिम्मेदारी सोपवली. ती म्हणजे कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याची. तेंव्हा तानाजी मालुसरे हसत म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे…तानाजी मालुसरे यांनी आपला भाऊ सूर्याजी मालुसरे, आणि शेलार मामा यांच्यासोबत कांही निवडक मावळ्यांना घेऊन कोंडाणा किल्ल्याच्या स्वारीवर निघाले. असे म्हंटले जाते की तानाजी मालुसरे यांनी यशवंती नावाच्या घोरपडीचा आधार घेऊन कोंढाणा किल्ल्याची सर्वात कठीण कडा चढली. त्यानंतर तानाजी मालुसरे आणि उदयभान सिंग राठोड यांच्यात घनघोर युद्ध झाले. तेंव्हा तानाजी मालुसरे यांच्या डाव्या हाताची ढाल तुटल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तेंव्हा सूर्याजी मालुसरे यांनी ज्या वाटेने सर्व मावळे गडावर चढले होते, त्या वाटेचे दोर कापून टाकले आणि आता इथून फक्त मरण पत्करूनच बाहेर पडा असे मावळ्यांना बजावले.

अशा रीतीने तानाजी मालुसरे यांच्या पश्चात सूर्याजी यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या तोंडून तानाजी यांच्याबद्दल ‘गड आला, पण सिंह गेला’ असे गौरवोद्गार निघाले. त्या अनुषंगाने शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव “सिंहगड किल्ला”असे ठेवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.