सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आनंद लुटावा या उद्देशाने अंजुमन -ए -इस्लाम बेळगाव यांच्यातर्फे उद्या मंगळवार दि. 4 ऑक्टोबरपासून जश्ने मिलाद फूड फेस्टिव्हलचे कोर्टासमोर अंजुमन मैदानावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंजुमन -ए -इस्लाम संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजू सेठ यांनी दिली.
शहरामध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सेठ यांनी ही माहिती दिली. अंजुमन -ए -इस्लाम बेळगावतर्फे उद्या मंगळवार दि. 4 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत जश्ने मिलाद फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. बेळगावसह परराज्यातील विशेष करून कोल्हापूर येथील नामांकित हॉटेल्स या फेस्टिव्हलमध्ये सहभाग दर्शविणार आहेत.
सदर फूड फेस्टिव्हलमध्ये चिकन, मटन व माशांचे विभिन्न मांसाहारी खाद्यपदार्थ, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी खाद्यपदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याखेरीज चाट वगैरें सारखे खाद्यपदार्थ आणि कुल्फी आईस्क्रीमचे स्टॉल देखील असणार आहेत असे सांगून हा फूड फेस्टिव्हल ‘बीफ’ (गो-मांस) विरहित असणार आहे, असे राजू सेठ यांनी स्पष्ट केले.
शहरातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकात मिसळून आनंद लुटावा. तसेच बेळगाव शहरात सर्व जाती धर्माचे लोक कसे गुणागोविंदाने शांततेत राहतात हे दाखवून देण्याच्या उद्देशाने या फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स बरोबरच या ठिकाणी महिला व मुलांसाठी शॉपिंगचा विभाग असणार आहे.
त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी मनोरंजनाची जागाही असणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर या फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून यातून जो कांही नफा मिळेल त्याचा विनियोग शिक्षण तसेच अन्य विधायक कार्यासाठी केला जाईल, अशी माहितीही राजू शेठ यांनी दिली. याप्रसंगी अंजुमन ए इस्लामचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.