Friday, April 26, 2024

/

सांबऱ्याच्या शतायुषी सुईण ‘नन्ही मॉं’ यांची एक्झिट

 belgaum

सांबरा येथील शतायुषी महिला व अनुभवी सुईण अमिनबी फकरुद्दीन तासेवाले उर्फ नन्ही मॉं यांचे आज (मंगळवार दि. २५) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. निधन समयी त्यांचे वय १०९ वर्षे होते. मंगळवारी दुपारी सांबरा येथे सर्व जाती धर्माच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत मुस्लिम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

‘नन्ही मॉं’ या अतिशय सुखरूप बाळंतपण करणाऱ्या प्रसुतीतज्ञ म्हणून परिचित होत्या. घरोघरी जाऊन बाळंतपण करण्याच्या समाजाभिमुख कार्यामुळे अमिनबी तासेवाले ऐवजी त्या ‘नन्ही मॉं’ या नावानेच सुपरिचित होत्या. कोणतेही शिक्षण न घेतलेल्या अशिक्षित अशा ‘नन्ही मॉं’ यांना महिलांची नैसर्गिक प्रसुती करण्याचा जणू वरदहस्त लाभला होता.

सुखरूप बाळंतपण आणि तान्हुल्यांना मालिश करण्यात त्यांचा हातखंडा होता. फक्त प्रसूती करून न थांबता ‘नन्ही मॉं’ सुईणीच्या नात्याने महिना -दीड महिना नवजात बालकाची आंघोळ घालून मालिश करण्याबरोबरच बाळंतिणीचीही तळमळीने काळजी घेत.

 belgaum
Pics mother sambra
Pics mother sambra nanni amma

‘नन्ही मॉं’ धर्माने मुस्लिम असल्या तरी त्यांची सेवा, जाती धर्मापलीकडे होती. बाळंतपण करत असल्यामुळे गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्याला त्यांचा पाय लागला होता. सांबरा गावातील अत्तार गल्लीत १० x १५ च्या घरामध्ये आयुष्य काढलेल्या ‘नन्ही मॉं’ यांनी सांबरा, मुतगा, बाळेकुंद्री, एअर फोर्स स्टेशन आणि बेळगाव परिसरात जवळपास 10 हजार हून अधिक नैसर्गिक बाळंतपणं केली आहेत.

तसेच असंख्य तान्हुल्यांना त्यांनी मालिश केली आहे. विशेष म्हणजे गावातील डॉ. वसंत कणबर्गी यांना अडलेल्या महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी बऱ्याचदा ‘नन्ही मॉं’ची मदत घ्यावी लागत होती.Chougule R m

सांबरा गावातील पन्नाशीच्या आतल्या निम्म्याहून अधिक मुलामुलींना त्यांनी एकदा तरी आंघोळ घातली आहे. वयोमानानुसार दृष्टी अंधुक होऊन हाताला कंप सुटत असल्यामुळे त्यांनी गेल्या २० वर्षापासून सुईणीचे काम थांबविले होते. फक्त तान्हुल्यांना मालिश करणे एवढेच काम सुरू ठेवले होते. सुमारे ५० वर्षांपूर्वी पती निधनानंतर ‘नन्ही मॉं’ यांना सुईणीच्या कामानेच आधार दिला होता. त्यांच्या या कामाचा वसा आता त्यांची मुलगी मेहबूब नझीरअहमद समशेर पुढे चालवत आहे.Ramesh goral deewali

मनमिळाऊ आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या ‘नन्ही मॉं’ सांबरा गावातील घराघरात सुपरिचित आणि प्रिय होत्या. पहाटे निधन पावलेल्या ‘नन्ही मॉं’ यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व थरातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.