Tuesday, April 16, 2024

/

‘नीट’ टॉपर ऋचा पावशेचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न!

 belgaum

बेळगाव Live विशेष : देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नीट युजी 2022 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत बेळगावच्या ऋचा मोहन पावशे हिने राज्यात दुसरा तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल बेळगाव Liveने ऋचाचे अभिनंदन करून प्रतिक्रिया जाणून घेतली डॉक्टर बनून जनसेवेचे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया ऋचाने व्यक्त केली.

“मी नीट परीक्षेमध्ये जे यश मिळवले, त्याचा मला अत्यानंद असला तरी माझ्या या यशाचे सर्व श्रेय सर्वस्वी माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि मोठा भाऊ डाॅ. प्रथमेश पावशे याचे मार्गदर्शन याला जाते, असे सांगून मी भविष्यात डॉक्टर बनून निस्वार्थ जनसेवाच करणार” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेमध्ये देशात चौथा क्रमांक पटकावणाऱ्या ऋचा मोहन पावशे हिने दिली.

नीट(NEET) परीक्षेतील या यशा नंतर आपण भविष्यात डॉक्टर बनून समाजसेवा करणार असल्याचे ऋचा पावशे हीने सांगितले. ऋचा आणि तिचा मोठा भाऊ प्रथमेश ही पावशे घराण्यातील चौथी पिढी आहे, जी डॉक्टरी पेशात उतरली आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून हे पावशे घराणे डॉक्टर पेशाच्या माध्यमातून जनसेवा करत आहे. ऋचाचा भाऊ प्रथमेश हा एमबीबीएस झाला असून तत्कालीन सीईटी परीक्षेतील त्याच्या उत्तम निकालामुळे त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्राची आणि केएलई संस्थेची सीट मिळाली. आज प्रथमेश पावशे आपले एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनला आहे. ऋचाचे वडील मोहन पावशे हे तर डॉक्टर आहेतच, शिवाय आई स्मिता पावशे या देखील डॉक्टर आहेत. डॉ. मोहन पावशे यांचे वडील आणि त्यांचे वडील हे देखील डॉक्टर होते हे विशेष होय! डॉ प्रथमेश व आता डॉक्टर होऊ पाहणारी ऋचा यांच्या स्वरूपात आता पावशे घराण्याची चौथी पिढी डॉक्टरी पेशा सांभाळणार आहे.Rucha pawashe

 belgaum

नीट मधील यशानंतर बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना सेंट झेवियर्स हायस्कूल आणि आरएसएस कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या ऋचा पावशे हिने मी नीट परीक्षेमध्ये जे यश मिळवले त्याचा मला अत्यानंद असला तरी माझ्या या यशाचे सर्व श्रेय सर्वस्वी माझ्या आजोबा आजीचे प्रोत्साहन, आई वडिलांचा आशीर्वाद आणि शाळा व कॉलेजमधील माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन विशेष करून मोठा भाऊ डाॅ. प्रथमेश पावशे याचे मार्गदर्शन याला जाते असे सांगितले. तसेच मला परीक्षा काळात सर्व प्रकारची मदत करून मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या दादासारखे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनण्याद्वारे जनसेवा करावयाची आहे, असे स्पष्ट केले. समाजकार्याची आवड असणाऱ्या ऋचाने डॉक्टर झाल्यानंतर फक्त उचगावच नव्हे तर बेळगावातील सर्वसामान्यांसह तळागाळातील रुग्णांची मला सेवा करायची आहे असा मानस बोलून दाखविला.

नीट सारख्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या भावी पिढीला खास सल्ला देताना ऋचा म्हणाली, नीट सारख्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्क्सची भीती असते. मात्र तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तुमची उत्तरे खात्रीपूर्वक बरोबर असतील तर कोणतीच भीती बाळगण्याची गरज नसते, नीट सारख्या परीक्षांसाठी संबंधित प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावयास हवा. यासाठी उगाच २४ तास त्यामध्ये गुंतून जाण्याची गरज नाही. वेळ मिळेल तेंव्हा मनापासून अभ्यास करण्याबरोबरच आपल्यासाठी आपल्या घरातील लोकांसाठी देखील थोडा वेळ काढत जा, असा संदेशही ऋचा मोहन पावशेने दिला.Rucha pawashe

आपली मुलगी ऋचाच्या यशाने आनंदाने गहिवरलेल्या डॉ स्मिता पावशे यांनी माझ्या मुलीच्या यशाचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. ऋचाचा भाऊ डाॅ. प्रथमेश याने नीट परीक्षेतील यशासाठी ऋचाने खडतर मेहनत घेतली असल्याचे सांगून भविष्यात आम्ही दोघे भाऊ-बहीण डॉक्टर या नात्याने जनसेवेस बांधील राहू असे स्पष्ट केले.

आपल्या पुतणीच्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक पावशे म्हणाले की, ऋचाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. पावशे घराण्याचे नाव आतापर्यंत राजकारणात महाराष्ट्र व कर्नाटकात सुपरिचित होते. मात्र आता ऋचाच्या या यशामुळे पावशे घराण्याचे नाव देशभरात उज्वल झाले आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.