Friday, April 26, 2024

/

पहिल्या रेल्वे गेट बॅरिकेड्स समस्येची पीएमओने घेतली दखल

 belgaum

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील अन्यायकारक बॅरिकेड्स विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक आणि दुकानदार व्यापाऱ्यांनी आठ वर्षापासून छेडलेल्या बॅरिकेड्स हटाव आंदोलनाला यश येण्याची चिन्हे अखेर दिसू लागले आहेत. या आंदोलनाची दखल घेताना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) या संदर्भात आश्वासक पत्र आले असून त्यामध्ये स्थानिक प्रशासनाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली जाईल असे नमूद आहे.

बेळगावचे प्रशासन दखल घेत नसल्यामुळे पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांनी रेल्वे गेटनजीक काँग्रेस रोडवरील मधोमध घातलेल्या बॅरिकेड्समुळे नागरिकांना होणाऱ्या मनस्ताप बाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. पोलीस खात्याकडून पहिल्या रेल्वे गेट समोर काँग्रेस रोडवर मधोमध बॅरिकेड्स घातल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची होणारी गैरसोय, त्यांना होणारा मनस्ताप याबाबत घोलप यांनी जवळपास 5000 हून अधिक स्थानिक रहिवाशांच्यावतीने पंतप्रधानांकडे तक्रार केली होती.

घोलप यांच्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून त्यामध्ये आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बेंगलोर येथील कर्नाटकच्या मुख्य सचिवांना सदर प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशा आशयाचा तपशील नमूद आहे.

 belgaum

आपल्या मागणी संदर्भात बोलताना सुभाष घोलप म्हणाले की, पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथे गेल्या 19 जून 2014 रोजी पोलीस खात्यातर्फे काँग्रेस रोडवर मधोमध बॅरिकेड्स घालून रेल्वे गेटमधून मंडोळीच्या दिशेने जाणारा रस्ता अडविण्यात आला आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र सदर बॅरिकेड्स घातल्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अधिक त्रासदायक झाली आहे.First gate

या बॅरिकेट्समुळे रॉय रोड, नेहरू रोड, सावरकर रोड, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी, गांधी कॉलनी, विवेकानंद कॉलनी या ठिकाणच्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बॅरिकेड्समुळे मोठा भोवाडा घालून त्यांना आपले घर, दुकान अथवा कामाच्या जागा गाठावी लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्य होण्याबरोबरच वाहनांच्या इंधनाचा खर्च वाढत आहे. टिळकवाडीतील मंगळवार पेठ येथे पूर्वापार गवळी समाजाचे वास्तव्य आहे. पहिला रेल्वे गेट येथील बॅरिकेड्समुळे गवळी बांधवांना आपली जनावरे मंडोळी परिसरातील गवत कुरणाच्या ठिकाणी नेण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनाही या बॅरिकेड्समुळे रस्ता ओलांडणे मनस्तापाचे ठरत आहे. यासाठी सदर बॅरिकेड्स तात्काळ हटवावेत आणि या ठिकाणी किमान दोन रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जावी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक बसविले जावेत अशी आमची मागणी आहे असे सुभाष घोलप यांनी स्पष्ट केले. सुभाष घोलप यांच्या या मागणीला मदन रेवाळे, दीपक गोंडाडकर, अजित नाईक आदी अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.