राकसकोप गावच्या स्मशानभूमीसाठी टेकडीवरील जमीन न देता गावानजीक असलेली पूर्वापार स्मशानभूमीची जमीनच मंजूर करावी, अशी मागणी राकसकोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बिजगर्णी ग्रा.पं. अध्यक्ष व सदस्यांच्या नेतृत्वाखाली राकसकोप ग्रामस्थांनी आज मंगळवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. रासकोप गावातील सर्व्हे नं. 23/2 या जागेमध्ये कित्येक वर्षापासून स्मशानभूमी आहे.
मात्र सरकारी आदेशानुसार गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी राकसकोप गावानजीकच्या एका टेकडीवर स्मशानभूमीसाठी 1 एकर 25 गुंठे जागा मंजूर केली आहे. सदर जागा फार उंचावर असल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाणे अवघड आहे.
पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या ठिकाणची जागा स्मशानभूमीसाठी मंजूर करावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिजगर्णी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली स्मशानभूमीची उंच टेकडीवरील जागा कशी सोयीची नाही याची माहिती दिली. तसेच राकसकोप गावची पूर्वापार चालत आलेली स्मशानभूमीची जागा ही खरेदी नव्हती.
मात्र या जागेचे जे मूळ खरेदीदार आहेत त्या येळेबैल येथील केसरकर बंधूंनी आता संबंधित जागा दानपत्राद्वारे राकसकोप ग्रामस्थांच्या नावावर केली आहे. त्यामुळे टेकडीवरील जागे ऐवजी सदर जमिनीलाच स्मशानभूमीसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.