वन खात्याला चकवा देऊन आज सकाळी रेस कोर्स जंगल परिसरात गायब झालेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता खास श्वानपथकं मैदानात उतरली आहेत. हुक्केरी येथून पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकांमध्ये मुधोळ हाऊंड श्वानांचाही समावेश आहे.
बेळगाव शहर परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला गुंगीच्या इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यासाठी लवकरच शार्प शूटर्स बेळगाव दाखल होणार आहेत. मात्र तत्पूर्वी रेसकोर्स जंगल परिसरात पलायन केलेल्या बिबट्याचा माग काढण्यासाठी हुक्केरी येथून खास प्रशिक्षित श्वान पथकांना प्राचारण करण्यात आले आहे.
या पथकांमध्ये गंध ओळखण्यासह शिकारीत तरबेज असलेल्या मुधोळ हाऊंड प्रजातीच्या श्वानांचाही समावेश आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्यावर 24 तास पाळत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असल्यामुळे सदर श्वानपथके आत्तापासूनच कामाला लागली असून त्यांनी रेस कोर्स परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
याखेरीज पोलिस आणि वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोंबिंग ऑपरेशन अथक सुरूच आहे.बिबट्याचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या श्वानपथकांमधील मुधोळ हाऊंड या प्रकारातील श्वान विशेष करून शिकारीचे श्वान म्हणूनच ओळखले जाते.
आपले लक्ष्य ओळखून चपळईने आणि गतीने त्याच्यावर हल्ला करण्यात ही श्वानं तरबेज असतात. इतर सर्वसाधारण श्वानांपेक्षा मुधोळ हाऊंड या श्वानाला गंध आणि गती अधिक असते. भारतीय लष्करानेही आपली छावणी, सीमेचे रक्षण आणि टेहळणी करण्यासाठी या श्वानाला लष्करात समाविष्ट करून घेतले आहे.
सोमवारी सायंकाळी वनखाते पोलीस खाते आणि स्पेशल टीमचे कोंबिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे आणि गोल्फ कोर्स जंगल परिसराचा कोपऱ्याकोपऱ्याची तपासणी केली जात आहे.
जेरबंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेळगावच्या वनखात्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याचा व्हीडिओ
अंदाजे चार वर्षाचा असलेला या बिबट्याने रेस कोर्स मैदानाची भिंत अशी पार केली त्याचा व्हीडिओ#Leapord#Racecourse pic.twitter.com/AhUovXf6cF
— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022