Saturday, June 15, 2024

/

‘ती’ गावे इकोसेन्सिटिव्ह झोन मधून वगळा – समितीची मागणी

 belgaum

खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इकोसेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

डॉ. रंगराजन यांच्या कस्तुरीरंगन अहवालानुसार खानापूर तालुक्यातील 62 गावांचा इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील ही बहुसंख्य गावे पश्चिम भागात येत असून या भागाची लोकसंख्या जवळपास 30 हजारहून अधिक आहे. या सर्वांना इकोसेन्सिटिव्ह झोनमुळे नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावर टाच येणार असून भविष्यात त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागणार आहे. या बाबींची राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेऊन जारी केलेली अधिसूचना मागे घ्यावी. केरळच्या धरतीवर खानापूर तालुक्यातील गावांना मुभा देण्यात यावी.

 belgaum

यासंबंधी खानापूर तालुका म. ए. समितीने गेल्या 5 मार्च 2017 रोजी निवेदनाद्वारे खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ही 62 गावे इकोसेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत अशी मागणी राज्य सरकार व संबंधित खात्याकडे केली होती. इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केल्याबद्दल सदर 62 गावातील जनतेचाही त्याला विरोध आणि आक्षेप आहे.Khanapur mes demand

त्याचबरोबर इकोसेन्सिटिव्ह झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठी 60 दिवसांची दिलेली मुदत अपुरी असून ती वाढवण्यात यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

यावेळी निरंजन सरदेसाई यांनी नितेश पाटील यांना नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत त्याबद्दल इंग्रजीत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी नितेश पाटीलयां नी खानापूर समितीचे मराठी भाषेतील निवेदनाचा स्वीकार करत भाषा महत्वाची नसून समस्या जाणून घेत आपल्या कृतीतून आपण कर्तव्यदक्ष आहोत हे देखील दाखवून दिले आहे.मध्यवर्ती समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घडवून आणली.

निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्यासह निरंजन सरदेसाई, धनंजय पाटील, देवाप्पांना गुरव, राजू पाटील, रवींद्र शिंदे, संभाजीराव देसाई, पी. एच. पाटील, रवींद्र पाटील, सुरेशराव देसाई, बळीराम पाटील, रामचंद्र गावकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.