Thursday, April 25, 2024

/

‘त्या’ मेजरची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस

 belgaum

बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा चार दिवस झाले तरी अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिसांच्या विशेष तपास पथकासह लष्करी अधिकारी व जवानांनी कसून शोध घेऊन देखील सुरजित सिंग यांचा शोध लागत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय कमांडो विंगने घेतला आहे

एमएलआयआरसीच्या कमांडो विंगमध्ये सेवा बजावणारे सुभेदार मेजर सुरजित सिंग एच.(वय 47) हे गेल्या शनिवारी सायंकाळपासून शहरातून बेपत्ता झाले आहेत. मूळचे गुरुदासपूर पंजाब येथील रहिवासी असलेले सुरजित सिंग गेल्या 10 वर्षांपासून कमांडो विंग येथे ते प्रशिक्षक म्हणून सेवा बजावत होते. आर्मी कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेले सुरजित सिंग बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार कॅम्प पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.

गेल्या शनिवारी सायंकाळी शहरात आपला मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी सायकलवरून आलेले सुभेदार मेजर सुरजित सिंग हे धर्मवीर संभाजी चौक येथील वैशाली रेस्टॉरन्ट आणि बार या ठिकाणी आपली सायकल स्टॅंडवर लावताना सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये शेवटचे आढळून आले होते. त्यानंतर बेपत्ता झालेले सुरजित सिंग कुठे गेले याचा आतापर्यंत कांहीच पत्ता लागलेला नाही.Major surjeet

 belgaum

एक लष्करी अधिकारी शहरातून गुढरित्या बेपत्ता होण्याच्या या घटनेची गांभीर्याने दखल घेताना पोलीस प्रशासनाने शहराच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली बेपत्ता सुरजीत सिंह यांच्या शोध घेण्यासाठी एका विशेष पोलीस तपास पथकाची नियुक्ती करून कसून शोध सुरू केला असला तरी आता चार दिवस उलटून गेले तरी या तपास पथकाच्या हाती कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत.

पोलिसांवर व्यतिरिक्त लष्कराचे अधिकारी आणि जवान गेल्या रविवारपासून सुरजित सिंग यांचा शोध घेण्यासाठी शहरातील गल्ली -बोळं पिंजून काढत आहेत. तथापि सुभेदार मेजर सुरजित सिंग जणू कांही हवेतच गायब झाल्याप्रमाणे नाहीसे झाले आहेत. सर्वत्र शोध घेऊन त्यांचा कोठेच पत्ता लागत नसल्यामुळे आता अखेर कमांडो विंगने सुरजित सिंग यांची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान या उपायांमुळे तरी बेपत्ता सुभेदार मेजर सुरजित सिंग यांचा पत्ता लागू शकेल अशी लष्करी अधिकाऱ्यांना आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.