दोन वर्षाच्या खंडानंतर आज सायंकाळी बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शिवजयंती मिरवणूक काळात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिस तैनात असल्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी एक पोलिस आयुक्त, 2 पोलिस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 16 पोलीस उपअधीक्षक, 44 पोलीस निरीक्षक, 62 पोलीस उपनिरीक्षक, 140 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2000 पोलिस कॉन्स्टेबल्स, 600 होमगार्ड त्याचबरोबर कर्नाटक सशस्त्र राखीव पोलिस दलाच्या 12 तुकड्या, जिल्हा सशस्त्र दलाच्या 10 तुकड्या, तोडफोड विरोधी दलाच्या 3 तुकड्या, गुप्तचर खाते, अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी नियुक्ती करण्यात आले आहेत.
सदर मोठ्या पोलिस बंदोबस्ताबरोबरच मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार असून मिरवणुक मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यापूर्वीच काळ या यादीतील गुन्हेगारांना समज देण्यात आली आहे.
परजिल्ह्यातून दाखल झालेल्या पोलिसांना नियोजित ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. तेंव्हा वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा आणि सर्वांनी मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.