Saturday, April 20, 2024

/

बहुजन समाजाचे हित हेच मराठा बँकेचे मुख्य ‘व्हीजन’

 belgaum

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड स्थापनेचा उद्देश आणि संस्थापकांसह दिग्गज लोकांनी घालून दिलेला पायंडा कायम ठेवताना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देऊन त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून बहुजन समाजाचे हित साधण्यासाठी आम्ही यापुढेही कार्यरत राहू, अशी ग्वाही मराठा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी दिली.

बहुजन समाजाचा मानबिंदू असणाऱ्या मराठा को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या 11 मे रोजी साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाइव्हशी बोलताना काकतकर यांनी उपरोक्त ग्वाही दिली. बाळासाहेब काकतकर म्हणाले की 1942 साली शहरातील रंगुबाई पॅलेस येथे गुरुवर्य शामराव देसाई यांच्या पुढाकाराने बैठक झाली आणि त्या बैठकीत बहुजन समाजाला व्यापार-उद्योग, शिक्षण, घरबांधणी आदीसाठी सहाय्य करणारी एखादी आर्थिक संस्था असावी या उद्देशाने सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पांगुळ गल्ली येथे भाड्याने घेतलेल्या एका लहानशा जागेत मराठा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ झाला.

त्यानंतर 1946 साली तत्कालीन चेअरमन व संचालकांनी परिश्रमपूर्वक भाग भांडवल वाढवून 1948 सालीची सोसायटीचे बँकेत रुपांतर करण्यात यश मिळवले. तेंव्हापासून बँकेने झपाट्याने प्रगती साधली असून बँकेला ज्यावेळी 25 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी रौप्य महोत्सवी समारंभ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. सदर सोहळ्यास महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते, असे बाळासाहेब काकतकर यांनी सांगितले.Balasaheb kakatkar

गणपत गल्ली येथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या मराठा बँकेचे 1977 साली बसवान गल्ली येथील स्वतःच्या मालकीच्या जागेत स्थलांतर झाले. याठिकाणी त्यावेळी उत्तर कर्नाटकातील लक्षवेधी अशी मराठा बँकेची तीन मजली इमारत उभारण्यात आली, जी सध्या बँकेचे मुख्य कार्यालय आहे. बँकेचे नूतन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर बँकेला भारतीय रिझर्व बँकेचा परवाना मिळाला.

परिणामी त्यानंतर मार्केट यार्ड येथे पहिली शाखा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याच हस्ते झाले. त्यानंतरच्या कालावधीत बँकेच्या संचालक मंडळाने छोटी-मोठी कर्ज देत आणि व्यवस्थित वसुली करत बँकेला प्रगतीपथावर आणले. बँकेने ट्रक लोन देण्यास सुरुवात केली, ज्याचा लाभ मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केला. त्यावेळी रिझर्व बँकेने फतवा काढला की तुम्ही कोठेही कर्ज उपलब्ध करून देऊ शकता. त्यानुसार उद्यमबाग येथे कर्ज उपलब्ध करून देण्यात सुरुवात करण्यात आली. सध्या उद्यमबागसह शहरातील नरगुंदकर भावे चौक, शहापूर, मराठा मंदिर आदी ठिकाणी बँकेच्या शाखा कार्यरत आहेत.Maratha bank logo

मराठा बँकेला प्रारंभीच्या काळात 25 -50 लाखाचा नफा होत होता. मात्र आजच्या घडीला हा नफा निव्वळ 6 ते 7 कोटी इतका होत असला तरी त्या नफ्याचे प्रोव्हीजन केले जात असल्यामुळे तो नफा 2.65 कोटी असा जाहीर करण्यात आला आहे. मराठा बँकेकडून 20 टक्के डिव्हिडंड देत दिला जात आहे. डिव्हीडंट वितरणानंतर शिल्लक राहिलेल्या निधीतून समाजाच्या विशेष करून बहुजन समाजातील लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वास्तु उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करताना बँकेचे संचालक तसेच तत्कालीन आमदार अर्जुनराव हिशोबकर यांनी टिळकवाडीतील रेल्वे ओव्हर ब्रिज नजीक जागा उपलब्ध करून दिली.

पुढे आमदारांसह अर्जुनराव घोरपडे, शिवाजीराव काकतकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मराठा मंदिरची भव्य इमारत उभारण्यात आली. येथे वस्तीगृहाची देखील सोय करण्यात आली आहे. यापुढील आमचे ‘व्हीजन’ एकच आहे की जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यातून होणाऱ्या नफ्यातून समाज विशेष करून बहुजन समाजाचे हित साधणे, असे बाळासाहेब काकतकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.