Thursday, March 28, 2024

/

ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे ‘हा’ परिसर भोगतोय नरकवास

 belgaum

बेळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्यासह कर्तव्य बजावण्यात केली जाणारी चालढकल यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट पुढे खानापूर रोडवरील गजानन साॅ मिलच्या मागील बाजूस असणाऱ्या वसाहतीतील लोकांना तुंबलेल्या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नरकवास भोगावा लागत आहे. गेल्या दीड -दोन महिन्यांपासून येथील घराघरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून या भागाच्या आमदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

तिसरे रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामामुळे खानापूर रोड येथून काँग्रेस रोड मार्गे जाणारी मुख्य ड्रेनेज पाईपलाईन एका ठिकाणी बुजली आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होणे बंद झाले असून खानापूर रोडवरील गजानन साॅ मिलच्या मागील बाजूस असणाऱ्या वसाहतीत ड्रेनेजचे पाणी ओव्हर फ्लो होत आहे. यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून सांडपाण्यामुळे नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. येथील घराच्या कंपाउंडमध्ये तसेच कांही घरांच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ओव्हर फ्लो झालेले ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी तुंबलेले आहे. घरातील शौचालयांची देखील हीच अवस्था आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ही समस्या निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे.

या ठिकाणी दर्जेदार लोणचे आणि सिरप उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असलेली आयडियल फूड प्रोडक्ट्स ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात देखील सांडपाणी शिरले आहे. गेल्या कांही दिवसात कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर देखील सांडपाणी साचू लागले आहे. आम्ही नियमानुसार संपूर्ण स्वच्छता बाळगून आमची उत्पादने तयार करत असतो. मात्र आता ड्रेनेजच्या या सांडपाण्यामुळे आम्हाला मोठा मनस्ताप होत आहे. शिवाय माझ्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे आयडियल फूड प्रॉडक्ट्सचे संचालक समीर लोकूर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.Drainage wster

 belgaum

सदर समस्या दूर व्हावी यासाठी येथील जागरूक युवक सुमीत किशोर सुतार हा गेल्या बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे सांडपाणी वसाहतीत पसरण्याच्या समस्येची तक्रार करण्यास गेल्यास महापालिकेचे अधिकारी ‘ते आमचे काम नाही, आम्ही फक्त गटारांची साफसफाई करतो, ब्लॉकेज असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जा, असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते पोलीस आम्हाला रस्ता खुदाई करण्यास परवानगी देत नाहीत, त्यामुळे आम्ही दुरुस्ती करू शकत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समजते.

तिसऱ्या रेल्वे गेट पुढे रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले असल्यामुळे ड्रेनेज पाईपलाईनचे दोन्ही चेंबर बुजले गेली असल्यामुळे ड्रेनेज सफाई अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपरोक्त समस्या निकालात काढावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.