वादळी पावसामुळे क्लब रोडवरील हर्षा मॉलनजीक अंगावर झाड कोसळून काल एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. तथापि उजेडात आलेल्या नव्या माहितीनुसार संबंधित धोकादायक झाडाबाबत वनखात्याला कल्पना देण्यात आली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे कालची दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शहरातील क्लब रोडवरील हर्ष मॉल नजीक रस्त्याशेजारी झाड अंगावर कोसळून विजय कोल्हापुरे या दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान यासंदर्भात नवी माहिती उजेडात आली असून स्थानिक रहिवाशांनी गेल्या 2 मार्च 2022 रोजी एका पत्राद्वारे बेळगावच्या सहाय्यक वनसंरक्षणाधिकाऱ्यांना (एसीएफ) संबंधित जुनाट झाड त्वरित हटवावे अन्यथा दुर्घटना घडू शकते, अशी सूचना करणारे पत्र धाडले होते. मात्र वनखात्याने कोणतीच कार्यवाही केली नाही. परिणामी काळी अमराई येथील 65 वर्षीय विजय कोल्हापुरे यांना नाहक आपला प्राण गमवावा लागला.
क्लब रोडवरील हर्षा इंटरप्राईजेसच्या मागील बाजूस आणि कृष्णा अपार्टमेंट समोर असणारे जुने झाड पूर्णपणे वाळून गेले आहे. सदर झाड कोणत्याही क्षणी कोसळेल अशा धोकादायक अवस्थेत आहे. झाड कोसळल्यास वित्तहानी आणि यदाकदाचित जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यातच या झाडाची फांदी तुटून पडल्याने पार्क केलेल्या एका कारगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या झाडाच्या फांद्या खालून विजेच्या ताराही गेल्या आहेत. तेंव्हा परिसरातील नागरिकांच्या जीविताला आणि त्यांच्या मालमत्तेला अधिक धोका निर्माण होण्यापूर्वी पुढील अनर्थ टाळण्यासाठी सदर झाड त्वरित हटविण्याची व्यवस्था केली जावी,
अशा आशयाचा तपशील क्लब रोडवरील स्थानिक रहिवाशांनी वनखात्याच्या एसीएफना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आला होता. या पत्राची वनखात्याने वेळीच दखल घेतली असती तर कदाचित कालची दुर्घटना टळली असती अशी प्रतिक्रिया क्लब रोड परिसरात व्यक्त होत आहे.