Friday, March 29, 2024

/

बायसिकल शेअरिंग : शहरात होणार 20 डॉकयार्ड

 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या ‘बायसिकल शेअरिंग’ योजनेसाठी शहरात विविध 20 ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्यात येणार असून संबंधित जागांचा वापर करण्यास महापालिकेने स्मार्ट सिटी विभागाला ना -हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

पर्यावरण संरक्षण तसेच शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून स्मार्ट सिटी लिमिटेडने शहरात बायसिकल शेअरिंग योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेबाबत 2019 साली नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सदर योजनेसाठी स्मार्ट सिटी लिमिटेडने काढलेल्या निविदा प्रक्रियेत धरणी इंटरप्राइजेस कंपनीला ठेका मिळाला आहे. कंपनीकडून आता शहरात आरेखन सुरू झाले आहे. काही ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्याचे काम सुरू देखील झाले आहे. ठेकेदाराने या योजनेतील सायकली देखील आणल्या आहेत. स्मार्ट सिटी लिमिटेडकडून सायकल ट्रॅक तयार होणाऱ्या विभागात ही योजना प्राधान्याने राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत सायकली शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी डॉकयार्ड तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी स्मार्ट सिटी लिमिटेडने शहरातील 20 जागा निवडून त्यांची यादी महापालिकेला पाठवली होती. आता महापालिकेने त्या जागांचा वापर डॉकयार्डसाठी करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

उद्यमबाग बसथांबा, खानापूर रोड, चन्नम्मानगर बसथांबा, खानापूर रोड आरपीडी क्रॉस, लेले मैदानाजवळ (डीएचओ कार्यालय) देशमुख रोड दळवी कॉम्प्लेक्स समोर, गोवावेस सर्कल येथील महापालिकेचे संकुल, गोगटे सर्कल, धर्मवीर संभाजी चौक बसथांबा, राणी चन्नम्मा चौक, कोल्हापूर सर्कल, जेएनएमसी -केपीटीसीएल रोड जंक्शन, हनुमाननगर सर्कल, एपीएमसी सर्कल, नेहरूनगर रोड, बसवण्णा सर्कल, केएसआरटीसी इंटरसिटी बसस्टॉप, श्रीनगर उद्यान, गोल्फ कोर्स, महांतेशनगर बसथांबा, हिंडलगा गणपतीची मागील बाजू आणि भरतेश होमिओपॅथिक कॉलेज (किल्ला) आदी ठिकाणी हे डॉक यार्ड होणार आहेत.

 belgaum

याठिकाणी बेळगावकराना माफक दरात भाड्याने सायकली उपलब्ध होणार आहेत. डॉकयार्डमधून सायकल घेतल्यानंतर ती शहरात कोठेही ठेवण्याची मुभा असेल. ठेकेदाराकडून ती सायकल पुन्हा डॉकयार्डमध्ये आणून ठेवली जाईल. योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्यात बायसिकल शेअरिंग योजना राबविणारे बेळगाव दूसरे शहर ठरणार आहे. यापूर्वी म्हैसूर शहरात ‘ट्रिंग ट्रिंग’ या नांवाने ही योजना आधीच राबवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.