बेळगाव शहरातील उज्वलनगर सहावा क्रॉस येथील रस्त्याशेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेऊन एल अँड टी कंपनीकडून सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
उज्वलनगर सहावा क्रॉस येथील जलवाहिनीला अलिकडे मोठी गळती लागून शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून उकिरड्यात वाया जात होते. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीने दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तसेच लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली जात होती. याबाबत बेळगाव लाईव्हने गेल्या 19 जानेवारी रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीकडून उज्वलनगर सहावा क्रॉस येथील नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील दुकानदारांसह रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.