Saturday, April 20, 2024

/

नेहरू वगळता सर्वच केंद्रीय गृह मंत्र्यांना पंतप्रधानाना सीमा प्रश्न समजावलेले एकमेव नेते शरद पवार

 belgaum

1970 पासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्षे सीमाप्रश्नाशी संबंधित नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पहावे लागेल .एक पंडित नेहरू वगळता बहुतेक सर्व केंद्रीय गृहमंत्र्यांना आणि तत्कालीन पंतप्रधानांना सीमाप्रश्न समजावून देऊन त्या प्रश्नासाठी सीमावासियांना मदत करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार हे आहेत असे मत माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे रविवारी पक्षाचे संस्थापक -अध्यक्ष ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आमच्या या सीमा प्रश्नासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला नेहमीच मदत व मार्गदर्शन केले आहे. त्यांच्याकडून आम्हा लोकांच्या खूप अपेक्षा आहे असे सांगून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी आम्हाला सहाय्यभूत व्हावे अशी सीमाभागातील मराठी भाषिकांची इच्छा आहे, असे मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले.

शहरातील वांडग्मय चर्चा मंडळाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे,मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी त्यांच्यासह निमंत्रित पाहुणे म्हणून द. म. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, समिती नेते प्रकाश मरगाळे, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इस्माईल मुल्ला, राष्ट्रीय महिला कार्यकारिणीच्या सदस्य रुपा देसाई व राज्य सदस्य के. टी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकानंतर प्रथम हेलिकॉप्टर अपघातात निधन पावलेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अन्य सर्वांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर केक कापून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.Sharad pawar birthday

यावेळी प्रा. आनंद मेणसे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी सर्वांगीण क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विशेषता काल शहरातील वैभवनगर येथील चर्चेमध्ये घुसलेल्या तलवारधारी व्यक्तीचा संदर्भ घेऊन मेणसे यांनी शरद पवार हे भारतातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारे धर्मनिरपेक्ष नेते असल्याचे सांगितले. आजच्या परिस्थितीत सर्व जातीधर्माच्या लोकांशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवून आपण सर्व भारतीय एक आहोत अशा दृष्टिकोनातून वागणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. पवार यांची आपल्या पक्षावर मोठी निष्ठा होती. पवार कुटुंबातील सर्व मंडळी लालबावटा शेतकरी -कामगार पक्षाशी संबंधित होती. परंतु शरद पवार काँग्रेसमध्येच राहिले. कालांतराने त्यांनी वेगळा पक्ष काढला असला तरी सुरवातीच्या काळात घरातील सर्वजण एका बाजूला असताना पवारांनी आपल्या पक्षाचे कार्य सोडले नाही. तेंव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली दिशा ठरविणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करून शरद पवार यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची आठवण प्रा. आनंद मेणसे यांनी उपस्थित सर्वांना करून दिली.

दीपक दळवी यांनी सीमा प्रश्नाच्या लढ्याच्या वाटचालीतील शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा याबाबत विवेचन केले. या सर्वच वक्त्यांनी कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्न फक्त शरद पवार साहेबच सोडवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास दुर्गेश मेत्री, नारायण बसर्गे, धनपाल अगशिमनी, आप्पासाहेब नाईक, श्याम मंतेरो, शिवाजी लाड, दीपक नार्वेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश मेत्री यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.