belgaum

उद्यमबाग येथील गोगटे इंजिनियरिंग कॉलेजच्या आवारामध्ये येत्या 23 डिसेंबर रोजी हायब्रीड जॉब फेअर अर्थात संकरित रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होईल, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण, माहिती -तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी दिली.

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आमदार, मंत्री आणि प्रतिनिधींच्या बैठकीनंतर मंत्री अश्वत्थनारायण पत्रकारांशी बोलत होते. ओला, एचपी वगैरे 32 कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार असून अजून 70 कंपन्या भाग घेण्यास इच्छुक आहेत. या संधीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपली नांवे ‘स्किल कनेक्ट’ पोर्टलवर नोंदवावीत. नांव नोंदणीनंतर एसएपी नंबर, कशा स्वरूपाचे काम हवे, कोणत्या कंपनींना उमेदवारांची गरज आहे आदी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

ज्या उमेदवारांची 23 डिसेंबर रोजी निवड होईल, त्यांची 24 डिसेंबर रोजी मुलाखत घेतली जाईल. ज्यांची निवड होणार नाही त्यांच्यातील कमतरतांचे विश्लेषण करून त्यांच्यासाठी कौशल्य प्रदान योजना आखली जाईल. राज्यातील एकूण 80 हजार बेरोजगारांपैकी 40 हजार जणांमध्ये अवश्य कौशल्याची कमतरता असल्याचे आढळून आले असून संबंधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असेही मंत्री नारायण यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री उमेश कत्ती, आमदार पी. राजीव, महेश कुमठळ्ळी, महांतेश दोड्डगौडा, महादेवप्पा यादवाड, दुर्योधन ऐहोळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.