belgaum

वीज पुरवठ्या अभावी कक्केरी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद पडली असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी या ठिकाणी सुरळीत वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी राज्याचे ऊर्जा आणि शक्ति खात्याचे मंत्री सुनीलकुमार यांच्याकडे केली आहे.

बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे ऊर्जा आणि शक्ति खात्याचे मंत्री सुनीलकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. कक्केरी गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी असलेली विद्युतदाहिनी वीज पुरवठा खंडित असल्यामुळे बंद अवस्थेत धूळखात पडून आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी कक्केरी ग्रामस्थांसह आसपासच्या परिसरातील गावामधील लोकांची गैरसोय होत आहे. तरी आपण या प्रकरणी लक्ष घालून कक्केरी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीला सुरळीत वीजपुरवठा सुरू करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती डॉ. सरनोबत यांनी मंत्र्यांना केली.

कक्केरी येथील समस्येबरोबरच पारिश्वाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकही उपपोलीस स्थानक नाही. त्यामुळे या भागातील लोकांना आपल्या तक्रारी दाखल करणे अडचणीचे जात आहे. ही बाब डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथनारायण यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पारिश्वाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उपपोलीस स्थानक सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. सदर निवेदनाची प्रत त्यांनी गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनाही सादर केली. तेंव्हा उभय मंत्र्यांनी सदर मागणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यापद्धतीने भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत या सातत्याने बस स्थानकांची समस्या, वीज पुरवठ्याची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या आदींबाबत सातत्याने पाठपुरावा करून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.