बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कलच्या मध्यभागी सध्या पोलीस छत्री नसल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय अपघाताचाही धोका वाढल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून या ठिकाणी चौकात पोलीस छत्री उभारण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकानजीकचे गोगटे सर्कल हे शहरातील प्रमुख सर्कल पैकी एक आहे. या ठिकाणी पूर्वी चार रस्ते एकत्र मिळत होते, आता रस्ता रुंदीकरणानंतर या सर्कलमध्ये जुळणाऱ्या रस्त्यांची संख्या आठ झाली आहे. पूर्वी गोगटे सर्कलच्या मध्यभागी पोलीस छत्री होती त्या ठिकाणी उभा राहून रहदारी पोलीस वाहतूक नियंत्रण करत होते. रहदारी पोलीस नसतानाही रस्त्यावरील वाहने या छत्रीला व्यवस्थित वळसा घालून जात असल्यामुळे या ठिकाणी क्वचित वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. आता अलीकडच्या काळात या सर्कलचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र हे सौंदर्यीकरण करताना गोगटे सर्कल अर्थात गोकटे चौकात मध्यभागी असलेली पोलीस छत्री हटविण्यात आली आहे.
गेल्या कांही वर्षात शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढतात असल्यामुळे गोगटे सर्कल मार्गे जाणाऱ्या रस्त्यांवर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. यात भर म्हणून या सर्कलमध्ये आता रहदारी पोलिसांची पोलीस छत्री नसल्यामुळे बस, ट्रक, टिप्पर आदींसारख्या एखाद्या जरी वाहनाच्या चालकाने चूक केल्यास चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सदर प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे वाहनचालकांना विशेष करून कामाची घाई असलेल्या किंवा तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
वाहतुकीच्या कोंडीत बरोबरच चौकाच्या मध्यभागी असणाऱ्या पोलीस छत्री अभावी गोगटे सर्कल येथे अपघाताचा धोकाही वाढला आहे. दिवसभर या ठिकाणी रहदारी पोलीस असले तरी त्यांच्या गैरहजेरीत या सर्कलमधून वाहन चालक भरधाव वेगाने हवी तशी वाहने हाकत असतात.
त्यामुळे चारही बाजूंनी येणारी वाहने लक्षात घेता या ठिकाणी एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याचा गांभीर्याने विचार करून गोगटे सर्कल येथे चौकाच्या मध्यभागी पूर्वीप्रमाणे पोलीस छत्री उभारण्यात यावी, अशी जोरदार मागणी वाहन चालक आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांकडून केली जात आहेत.