खानापूर तालुक्यातील नंदगडपासून 2 कि. मी. अंतरावर असलेल्या गवळीवाडा येथील तब्बल 20 पाळीव गाई गेल्या सहा दिवसात अचानक दगावल्या आहेत. यामुळे संबंधित जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गवळीवाड्यातील जनावर मालकांनी नंदगड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गाईंच्या मृत्यूची माहिती दिली असली तरी यासंदर्भात अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. दरम्यान आणखी काही गाई आजारी पडल्या आहेत.
याबाबतची माहिती मिळताच नंदगड येथील भाजप कार्यकर्ते विजय कामत त्यांनी यासंदर्भात पशु संगोपन खात्याच्या जिल्हा संचालकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तेव्हा लागलीच जनावरांच्या डॉक्टरांचे एक पथक गवळीवाडा येथे पाठविण्यात आले.
या वैद्यकीय पथकाने उर्वरित गाई-म्हशींना रोग प्रतिबंधक लस दिली आहे. नंदगड नजीकच्या या गवळीवाड्यात जवळपास 20 कुटुंबे असून त्यांच्याकडे सुमारे 200 गाई-म्हशी आहेत. या जनावरांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अवघ्या सहा दिवसात अचानक 20 गाई मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.