ताई माई अक्का विचार करा पक्का या चिन्हावर शिक्का या प्रकारचे मजकूर वाचत फिरणाऱ्या रिक्षा, मोठ्या प्रमाणात येणारे कार्यकर्ते आणि कोपऱ्या कोपऱ्यात होणाऱ्या सभा, गल्लीच्या कोपऱ्यावर दररोज सायंकाळी होणाऱ्या भलेमोठ्या बैठकी…. असेच मागील पाच वर्षापर्यंत महानगरपालिका निवडणुकीचे स्वरूप होते .मात्र या वेळी वेगवेगळ्या अडचणी नियम आणि सोशल मीडियाचा वाढता विस्तार यामुळे निवडणूक प्रचाराचे स्वरूपच बदलले असल्याचे जाणवत आहे.
.यावेळची निवडणूक कोरोनाच्या दुष्टचक्रात जाहीर झाली त्यामुळे विविध नियम आणि अटींच्या कचाट्यात उमेदवार अडकले ,वेळ कमी मिळाला, यामुळे मोबाईल वरून वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर प्रसारित करणे आणि घरोघरी जाऊन भेटी घेणे एवढेच प्रचाराचे स्वरूप झाले आहे.
प्रचाराच्या स्वरूपावर असंख्य मर्यादा आल्या आहेत .सोशल मीडियाचा वाढता वापर सुरू झाल्यामुळे आणि प्रत्येक मतदाराच्या हातात मोबाईल आल्यामुळे उमेदवारांनी आपला जाहीरनामा , तसेच मी निवडणुकीत सहभागी होणार आणि मतदान करा असे आवाहन हे सुद्धा सर्व काही मोबाईलवरून पसरवण्यास सुरुवात केली आहे.
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न अनेक उमेदवार करत आहेत. यासाठी व्हॉइस मेसेजेस आणि इतर माध्यमांचा अवलंब केला जात आहे. शनिवार आणि रविवार जास्तीत जास्त लोक घरी असतात मात्र भव्य सभा घेऊन त्यांचे मत व मने जिंकून घेण्याचा प्रयत्न या वेळी कोणालाही करता आला नाही. कारण कोरोनामुळे लादल्या गेलेल्या विकेंड कर्फ्युचा फटका उमेदवारांनाही बसला आहे.
मात्र जाहीर सभांचे काम हातातील मोबाईल करू लागला असून आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे आपल्या वार्डात नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहे. एकूणच प्रचारावर मर्यादा आल्या तरी अधिक जास्त प्रमाणात आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.