बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार असलेल्या टी-सेल अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (टी-ऑल) या आजाराशी धैर्याने लढणाऱ्या आराध्या कृष्णा पार्लेकर या 10 वर्षीय बालिकेला सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील यंग बेळगाव फाउंडेशनने आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.
आराध्या पार्लेकर ही सध्या बेळगाव येथील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्या उपचाराचा खर्च अंदाजे 8 ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान असल्यामुळे पार्लेकर कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे.
आराध्याची प्रकृती आणि पार्लेकर कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण पाहून प्रभावित झालेल्या यंग बेळगाव फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आराध्या हिच्या उपचारांसाठी निधी उभारला. जमा झालेली रक्कम फाउंडेशनचे प्रमुख ॲलन विजय मोरे यांनी केएलई हॉस्पिटल येथे आराध्याच्या कुटुंबीयांकडे धनादेशाच्या स्वरूपात सुपूर्द केली. याप्रसंगी यंग बेळगाव फाउंडेशनचे सदस्य ओमी कांबळे, अद्वैत चव्हाण पाटील, अनिकेत आनंद रोआ पाटील, नानेश्वर राजू अनबर, तसेच आराध्याचे वडील आणि काका उपस्थित होते
त्यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते ॲलन मोरे यांनी जनतेला पुढे येऊन आराध्या पार्लेकर हिच्या वरील उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. “प्रत्येक मुलाला जीवनात संधी मिळायला हवी. आराध्या एक धाडसी लढाई लढत आहे आणि सर्वांच्या पाठिंब्याने आपण तिला जिंकण्यास मदत करू शकतो. शक्य होईल तितक्या मार्गाने योगदान देण्याचे आवाहन आम्ही सर्वांना करतो,” असे ते म्हणाले.
आराध्या हिला मदत करू इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी किंवा देणगी देण्यासाठी बेळगाव येथील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहनही ॲलन मोरे यांनी केले.