बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने केवळ खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला नाही तर नदीचे पाणी शेतवाडीत शिरल्याने पिके देखील वाहून गेल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
खानापूर तालुक्यातील तळावडे येथे नदीचे पाणी शेतवडीत शिरल्याने रताळी व रताळ्याचा वेल वाहून गेली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तळावडे (ता. खानापूर) याठिकाणी नदीच्या काठावरील शेतजमीनीत मलप्रभा नदीचे पाणी शिरल्याने शेतवडीत नांगरून ठेवलेली रताळी व नवीन लागवडीसाठी ठेवण्यात आलेले 90 भारे रताळ्याचा वेल वाहून गेल्याने दोघा शेतकऱ्यांचे मिळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व संबंधित विभागाने नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात अतिदुर्गम भागात वसलेल्या तळावडे येथील शेतकरी शंकर नारायण कुलम व कृष्णा पीलाप्पा कुलम, या दोघा शेतकऱ्यांची जमीन मलप्रभा नदीच्या काठावर असून, या दोघाही शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्यासाठी रताळ्याची लागवड केली होती.
लागवड केल्याप्रमाणे रताळ्याचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले होते. रताळी काढण्यासाठी त्यांनी जमीन नांगरली होती. परंतु रताळी जमा करताना मुसळधार पाऊस पडल्याने मलप्रभा नदीला पुर आला व नदीचे पाणी या दोघांच्याही शेतामध्ये शिरले, त्यामुळे, संपूर्ण रताळी नदीच्या पाण्यातून वाहून गेली. तसेच रताळी काढल्यानंतर पावसाळ्यात रताळी पीक लागवडीसाठी वेल सुद्धा शेतामध्ये आणून ठेवण्यात आला होता. तो सुद्धा नदीच्या पुरातून वाहून गेला आहे. त्यामुळे सदर दोघांही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये शंकर नारायण कुलम यांची 50 हजार रुपयांची रताळी वाहून गेली आहेत. तर, पावसाळ्यात रताळी लागवडीसाठी 50 ते 60 भारे वेल (अंदाजे रक्कम 50 हजार रुपये) शेत जमिनीत ठेवला होता, तो सुद्धा वाहून गेला आहे, त्यामुळे शंकर नारायण कुलम यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, कृष्णा पिल्लाप्पा कुलम या शेतकऱ्यांने रताळी लागवडीसाठी 30 भारे रताळ्याचा वेल ठेवला होता, तो वाहून गेला आहे. तसेच रताळी सुद्धा वाहून गेल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यासाठी खानापूरचे तहसीलदार तसेच शेतकी विभागाचे अधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी, या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.