बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक आरोपी अखेर बेळगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या गुन्ह्यातून लाखोंच्या सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, तपासात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेळगाव शहरातील टिळकवाडी भाग्यातील इंडियन बँकेतील लॉकर फोडीच्या प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी यशस्वी तपास करत एक आरोपी अटक केला आहे. चंद्रकांत बालाजी जॉर्ड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १४३.९ ग्रॅम वजनाचे, सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, या कामगिरीबद्दल संबंधित पथकाला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. दरोड्याच्या घटनेनंतर आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त एन. निरंजनराजे अरस, एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय विश्वनाथ घंटामाथ, पीएसआय प्रभाकर डोळ, तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस. एम. करगण्णवर, लाडजीसाब, नागेंद्र तळेवार, अरुण पाटील आणि नवीनकुमार जी. यांनी या तपासात विशेष योगदान दिले. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
