Thursday, April 25, 2024

/

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची करा चौकशी-मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 belgaum

गेल्या 5 वर्षापासून बेळगाव स्मार्ट सिटीची विकास कामे रखडत सुरू आहेत. याकडे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन याला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि येत्या 6 महिन्यात बेळगाव स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शहरातील वकिलांनी समस्त नागरिकांच्यावतीने राज्याचे नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे.

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचे रखडत चाललेली विकास कामे, त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप, कांही नागरिकांचे गेलेले बळी यासंदर्भात शहरातील नागरिकांच्यावतीने ॲड. अण्णासाहेब घोरपडे, ॲड. एन. आर. लातूर आदींनी आज शनिवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नांवे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन सादर करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बेळगाव स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून जी कामे होत आहेत ती निकृष्ट दर्जाची आहेत. बरीच कामे रखडली आहेत. गेली 5 वर्षे झाली तरी अद्याप विकास कामे पूर्ण झालेली नाहीत. अर्धवट कामांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघात घडताहेत. कांही ठिकाणच्या धोकादायक स्थितीतील कामांमुळे नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे.belagavi-smart-city-logo

 belgaum

मंडोळी रस्त्यावर जवळपास वर्षभरापूर्वी विकास सायकलस्वार वृद्धाचा स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यानंतर आणखी दोघांचे आणि अलीकडे मध्यवर्ती बस स्थानकानजीक एका वृद्धाचा शरीरात लोखंडी सळ्या घुसून मृत्यू झाला. स्मार्ट सिटीच्या विकासकामांचे हे बळी आहेत.

या खेरीज नुकत्याच झालेल्या पावसामुळे विकासकामांचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. तेंव्हा या सर्वांची गांभीर्याने दखल घेऊन नुतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वतः बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत लक्ष घालावे आणि योजनेच्या विलंबास कारणीभूत अधिकाऱ्यांच्या चौकशीसह ही योजना 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी ॲड. अण्णासाहेब घोरपडे, ॲड. एन. आर. लातूर, ॲड. सुभाष मोदगेकर, ॲड. शरद देसाई, ॲड. बी. पी. जिवनी, ॲड. जी. डी. भावीकट्टी, ॲड. मोहन नंदी, ॲड. आर. एल. नलवडे, ॲड. मारुती काम्माणाचे, ॲड. एल. के. गुरव, ॲड. व्ही आय महांतशेट्टर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या नांवेदेखील निवेदनाची प्रत देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपणही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.