Friday, March 29, 2024

/

बळ्ळारी नाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती : पिकांचे मोठे नुकसान

 belgaum

गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून येळ्ळूर, अनगोळ आणि वडगाव शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे यंदादेखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

बेळ्ळारी नाला हा मजगाव ,येळ्ळूर, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, बसवन कुडची आदी भागातून गेला आहे. यावर्षी देखील बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पहिल्याच पावसात बळ्ळारी नाला पात्राबाहेर आल्यामुळे येळ्ळूर, अनगोळ, वडगाव शिवारातील भात पिके, टोमॅटो, मिरची आणि कोबी पिकात पाणीच पाणी होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी देखील शेतकऱ्यांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. बळ्ळारी नाल्यात जलपर्णी कचरा व गवत वाढल्यामुळे सध्या नाल्यातील पाणी पात्राबाहेर पडून शेतवाडी जात आहे. यामुळे नाल्या नजीकच्या शेतातील गाद्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पहिल्याच पावसात शेतात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ठीकठिकाणी बांध फुटून पेरलेले भात वाहून गेले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. शेतामध्ये अजून कांही दिवस असेच पाणी राहिल्यास संपूर्ण भात पीक पूर्णपणे खराब होणार आहे. त्यामुळे सरसकट सर्व शेतकर्‍यांना दुबार पेरणी किंवा रोप लावणी करावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. रोप लावणीसाठी एकरी सुमारे 40 हजार रुपये खर्च येतो. येळ्ळूर शिवार परिसरात प्रामुख्याने बासमती जातीचे भात पीक घेतले जाते. मोठी मागणी असलेल्या या भाताचे पिक पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Bellari nala yellur

 belgaum

येळ्ळूर, अनगोळ, वडगाव शिवारात पावसाळ्यात निर्माण होणारी पुर सदृश परिस्थिती टाळण्यासाठी बळ्ळारी नाल्याची वेळच्यावेळी सफाई केली जावी. त्यातील जलपर्णीसह गाळ काढला जावा, अशी मागणी दरवर्षी बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते. मात्र प्रशासनाकडून सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

परिणामी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान होण्याद्वारे शेतकऱ्यांना जबर किंमत मोजावी लागते. मागील वर्षी देखील या नाल्याला पूर आल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते आता. पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असून प्रशासनाने आतातरी जागे होऊन पाऊस कमी होताच बळ्ळारी नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करून पुराचे आगामी संकट तरी टाळावे, अशी मागणी शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.