Friday, March 29, 2024

/

20 मुलांवर ‘झायको व्ही-डी’ ची यशस्वी चांचणी : डॉ. अमित भाते

 belgaum

शहरातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक स्वदेशी झायको व्ही-डी लसीची 20 मुलांवरील चांचणी यशस्वी झाली असून लस दिल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधीत एकाही मुलाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्टचा त्रास अथवा आरोग्याबाबतच्या तक्रारी झाल्या नसल्याची माहिती डॉ. अमित भाते यांनी दिली.

देशातील दुसऱ्या स्वदेशी बनावटीच्या झायको व्ही-डी या कोरोना प्रतिबंधक लसीची 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमुलींवरील पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चांचणी (ट्रायल) बेळगावातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली आहे. सदर क्लिनिकल चांचणीमध्ये लस देण्यात आल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधीत कोणत्याही मुलाला साईड इफेक्टचा त्रास अथवा आरोग्याची तक्रार उद्भवली नसल्याचे जीवनरेखा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भाते यांनी सांगितले.

गेल्यावर्षी देशातील ज्या 12 केंद्रांमध्ये कोहॅक्सीनच्या यशस्वी चांचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये जीवनरेखा हॉस्पिटलचा समावेश आहे. आपला हॉस्पिटलमधील डॉक्टर्स गेले दोन महिने सर्व 20 मुलांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून होते आणि त्या काळात सर्व मुले तंदुरुस्त होती. क्लिनिकल चांचणी दरम्यान सर्व मुलांना झायको व्ही-डी लसीचे प्रत्येकी तीन डोस देण्यात आले होते असे सांगून संबंधित सर्व मुला-मुलींच्या पालकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या मुलांना या क्लिनिकल चांचणीसाठी पाठवल्याचे डॉ. भाते यांनी सांगितले.Dr amit bhate

 belgaum

क्लिनिकल चांचणीपूर्वी सर्व 20 मुलांच्या पालकांच्या संमतीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. मुलांनी या चांचणीला उत्तम प्रतिसाद दिला याचा आम्हाला आनंद आहे. सरकारकडून झायको व्ही-डी लस मुलांसाठी उपलब्ध करण्यापूर्वी लस यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी संबंधित मुलांच्या रक्ताच्या नमुन्याची आणि प्रतीद्रव्यांची पुढील बारा महिन्यांमध्ये सातत्याने तपासणी केली जाणार आहे, असेही डॉ अमित भाते यांनी स्पष्ट केले.

तसेच आपल्या हॉस्पिटलमधील क्लिनिकल चांचणीच्या यशाबद्दल माहिती देण्याबरोबरच देशभरातील 30 ठिकाणी या पद्धतीने झायडस कॅडीला कंपनीच्या झायको व्ही-डी लसीच्या चांचण्या घेण्यात आल्या असून त्या देखील निश्चितपणे यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.