Friday, April 26, 2024

/

…अन् आता पुनश्च हरवू लागली आहे माणुसकी

 belgaum

लोकांचे पटापट होणारे मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता दर्शवू लागले आहेत. याबरोबरच कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना वाळीत टाकण्याचा माणुसकी हरवत चालल्याचा प्रकार पुन्हा सुरू झाला असून याची प्रचिती काल होसूर  भागात आली.

होसुर भागात राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्धाचा काल सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या वृद्धाच्या पश्चात 70 वर्षीय पत्नी आणि मुलगा तसेच अन्य परिवार आहे. मुलगा कामानिमित्त आपल्या कुटुंबासह परगावी असतो. काल सदर वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच बेळगावातील नातेवाईकांसह भीतीपोटी बसवान गल्लीतील कोणीही त्यांच्या घराकडे फिरकले नाही.

त्यामुळे त्या वृद्धाची बिचारी वयस्कर पत्नी असहाय्य एकाकी अवस्थेत आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून होती. याबाबतची माहिती मिळताच हेल्प फॉर नीडीच्या सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बसवान गल्ली होसुर येथे धाव घेतली. तसेच त्या वृद्धेला धीर देऊन तिचे सांत्वन करून मयत वृद्धावर अंत्यसंस्कार केले. दरम्यानच्या काळात गल्लीतील नागरिकांनी मात्र दूर उभे राहून बघ्याची भूमिका घेतली होती.

 belgaum

कोरोना हा हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग असल्यामुळे मागील वर्षी देखील या रोगाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होऊन लोकांचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली त्यावेळी देखील वरील प्रमाणेच मृतासह त्याच्या नातलगांना वाळीत टाकण्याचे प्रकार झाले होते. हा माणुसकी हरवल्याचा प्रकार आता पुनश्च सुरू झाला आहे. तसे पाहता हँड ग्लाऊज, फेस मास्कसह संबंधित आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आपण कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. मात्र लोकांमध्ये पसरलेल्या अनाठाई भीतीमुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची परवड होण्याचे प्रकार आता पुन्हा सुरू झाले आहे. परिणामी हेल्प फॉर नीडी सारख्या सेवाभावी संघटना पुढाकार घ्यावा लागत आहे.Food for needy

मृत आणि त्याच्या नातलगांना वाळीत टाकण्याचा हा जो प्रकार सुरू झाला आहे त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी खेद व्यक्त केला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असते.

अशावेळी खरेतर नातलग आणि आसपासच्या नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याद्वारे त्यांना धीर देऊन अंत्यसंस्कारासाठी आपल्यापरिने मदत करावयास हवी, असे मत देखील अनगोळकर यांनी व्यक्त केले. सुरेंद्र अनगोळकर यांनी हेल्प फॉर नीडीच्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनामुळे मृत पावलेल्या अनेक जणांच्या संस्कारासाठी मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.