Friday, April 26, 2024

/

युगानुयुगे बाई झुंझत आली काळाशी

 belgaum

आपल्या घराच्या भिंती, अंगण तिनं चाचपडलं आपल्या बोटाने! दारातील तुळशी वृंदावन तिची सखी बनलं. चुलीशी तर तीच पिढ्यान पिढ्यांचं नातं! चुलीच्या आगीवर भाकरी शिकताना अनेक चटके तिने सहन केले. आणि त्या चटक्याबरोबर आयुष्य फुलवत गेली.

प्रत्येक चटका हा तिच्या आयुष्यासाठी महत्वाचा ठरला. कारण तिच्या आतड्याची माणसे तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती. या चुलीवरच तिच्या माणसासाठी ती जेवण बनवणार होती. त्यांच्या पोटाची भूक शमवणार होती. आणि त्या प्रत्येक शमणाऱ्या भुकेच्या घसाबरोबर तिचा आनंद फुलत जाणारा होता, हे बाईचं जगणं. बाई साधी आणि सोपी असते जोवर तिच्यातील अग्नी फुलत नाही तोपर्यंत. बाई अग्निशी झुंजते, वाऱ्याशी झुंजते, काळाशी झुंजते, परिस्थितीशी झुंजते, जोवर तिच्यातील बाईपण शांत असते तोवर. बाईच्या झुंजण्यात तिची सात्विकता कायम टिकून असते.

कारण बाईला निर्मितीचा ध्यास असतो. बाई विध्वंस करू इच्छित नाही. ती नेहमीच निर्मिती करण्याच्या मागे असते. आणि हा सारा संसार टिकलाय तो बाईच्याच बोटावर.घर सावरलं तिनं, घर सजवलं तिनं, अंगण सजवलं तिनं, अंगणात रांगोळी घातली, घराच्या भिंतीतल्या कानाकोपऱ्याला सजवलं तिनं, अगदी घरातील प्रत्येक वस्तूला तिचा हात लागतो, हे तिचं बाईपण! बाई हे बाईपण जपत जपत आपलं आयुष्य रेटत राहते. तिच्यासह तिच्या सख्यासोबतींचे आयुष्यदेखील पुढे चालत असते.

 belgaum

बाई आई होते, बाई सखी होते, बाई आजी होते, बाई सगळं काही होते. बाई असते आभाळभर माया घेऊन उभारलेली एक चादर! कुणीही यावं, सावलीला उभं रहावं.. आज जागतिक महिला दिन…! हा एकाच तिच्या सुखाचा दिवस. हा एकच दिवस तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा. पण ती कुठंच थांबलेली नसते, त्या सलमासाठी. कारण तिला माहित असते या सगळ्यास्तही वर्षभर तिला राबायचं आहे. या सगळ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. परंतु आज आपणच एकदिवस स्तब्ध होऊन तिच्या कर्तृत्वाला सलाम करायचा आहे. बाई तुमच्या सलमाला कधीच थांबलेली नाही. कारण बाईच्या कण्यावरच घराचा डोलारा उभा असतो. घराचा गाडा चालतो तो बाईमुळे.Naari

ज्या घरात बाई नाही, ते घर किती मोडकळीस येते याची कल्पनाही न केलेली बरी. कारण बाईने ते एका ताकदीनं संभाळलेलं असत. घरातील कर्ता पुरुष व्यसनाधीन झाला, काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला, तरी बाई ठामपणे उभी राहून ती घर पुन्हा सावरते, सांभाळते. म्हणून जगातील प्रत्येक शक्तीला नाव हे महिलेचं आहे. अशा या महिलेच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एक दिवस आपण साऱ्यांनी तिच्यासाठी राखून ठेवला आहे.

बेळगाव परिसरातील महिला तर विशेषत्वाने पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यात आघाडीवर आहेत. शेतशिवारात, ऑफिस, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय क्षेत्र, संगीत, कला, क्रीडा यासह अनेक व्यवसायात बेळगाव मधील महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस आहेत. क्रीडा क्षेत्रात अनेक महिलांनी नाव कमाविले आहे. याचप्रमाणे संगीत, कला, क्रीडा, शिक्षण, सौंदर्यक्षेत्र, नाटक, नृत्य, साहित्य अशा अनेक क्षेत्रात बेळगावमधील महिलांचा मोठा वाटा आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही, जिथे बेळगावच्या महिलांनी आपले नाव चमकविले नाही. महिलांचा डंका भारतच नाही तर भारताबाहेरही पसरला आहे. बेळगावचे नाव चमकविणाऱ्या या समस्त नारीशक्तीला सलाम आणि बेळगावची पताका सर्वदूर फडकविण्यासाठी आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा आणि ‘बेळगाव लाईव्ह’चा मनाचा मुजरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.