Friday, July 19, 2024

/

बेळगावची चक दे गर्ल ..रोहिणी

 belgaum

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…

बेळगावमधील युवतींनी, महिलांनी आपले स्थान उंचावत कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अशा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय स्तरावर चमकावले आहे. क्रीडाक्षेत्रात अशाचपद्धतीने आपल्या जिद्दीच्या जोरावर रोहिणी पाटील हिने ज्युदो या क्रीडाप्रकारात नावलौकिक मिळविले आहे. चंदगड (अष्टे) येथील बाबुराव पाटील यांची कन्या रोहिणी पाटील हिने एनआयएस डिप्लोमा पूर्ण केला असून हिंदी विषयात एम.ए., एम.फील. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2003 पासून ज्युदोपटू म्हणून दाखल झालेल्या रोहिणीने आजतागायत राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश मिळविले आहे. अनेक स्पर्धांमधून गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदके मिळवत सध्या प्रशिक्षकपदापर्यंत मजल मारली आहे.

निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ. अशा खेळात एकलव्य पुरस्कार, कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन पुरस्कार, केंद्र सरकारचा रोख रक्कमेचा पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, नॅशनल मेडल असे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, तसेच नेपाळ येथे झालेल्या साऊथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाने रोहिणी पाटील हिला सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच बारावे सिनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (पटियाला) , सिनियर एशियन चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (बंगलोर) , ज्युनियर एशियन ज्युदो चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (पटियाला), साऊथ एशियन ज्युदो चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (पटियाला), चौदावे ज्युनियर वर्ल्ड ज्युदो चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (पटियाला), साऊथ एशियन गेम्स कोचिंग कॅम्प (भोपाळ), कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप कोचिंग कॅम्प (भोपाळ) यामध्ये सहभाग घेतला आहे.Rohini patil

राष्ट्रीय स्तरावर झारखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्स रांची या स्पर्धेत सुवर्ण पदक, सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप कोलकाता मध्ये सिल्व्हर पदक, सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप हरिद्वार मध्ये ब्रॉन्झ पदक आणि नॅशनल फेडरेशन कप हिस्सार (हरियाणा) मध्ये ब्रॉन्झ पदक, सिनियर फेडरेशन कप विजयवाडा (आंधरप्रदेश) येथे सिल्व्हर मेडल, पटकाविले आहे. तर सिनियर नॅशनल कोची (केरळ) आणि चंदिगढ येथे झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप येथे उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. तसेच शिमोगा, मंगळूर, शिमोगा, म्हैसूर, बेळगाव याठिकाणी झालेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्तम यश मिळविले आहे.

क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून बेळगावचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविणाऱ्या ज्यूदोपटू रोहिणी पाटील हिला महिलादिनी ‘टीम बेळगाव लाईव्ह’कडून सलाम.. आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानुरकर सांबरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.