Tuesday, April 16, 2024

/

कोड – पांढरे डाग-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

विटिलिगो म्हणजेच पांढरे  कोड, हा त्वचेशीसंबंधी विकार आहे, पांढरे डाग हे संसर्गजन्य नाहीत. म्हणजे पांढरे डाग एका व्यक्तीच्या स्पर्शाने दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. तसेच आपल्या आहाराशी देखील काहीही संबंध नाही. हा एक ऑटो-इम्यूनो डिसऑर्डर आहे, ज्यात शरिरातील रोग प्रतिरोधक क्षमता शरिरालाच त्रास देण्यास सुरूवात करतात.

यात त्वचेचा रंग बनवणारे सेल्स म्हणजेच Melanocyte कमी होतात किंवा काम करण्याचे बंद करतात, ज्यामुळे शरीरावर पांढरे डाग होतात. ही समस्या मोठ्या प्रमाणात ओठांजवळ आणि हातावर, हात-पाय-चेहरा, शरिराच्या वेगवेगळ्या जागेवर होतात.

यामुळे लोक स्वत: ला दुसऱ्यांपेक्षा वेगळे समजू लागतात. काही लोकांना वाटते की, यावर उपचार नाही, परंतू असे अजिबात नाही. याच्यावर उपचार होऊ शकतो, फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते.
महत्वाचे म्हणजे ज्या लोकांना पांढरे डाग आहेत, त्यांनी घटट् कपडे आणि रबर-केमिकल्स पासून लांब रहावे, असे न केल्यास पांढरे डाग वाढण्याची शक्यता असते. मात्र पांढरे डाग त्वचेवर पडण्यास रबर केमिकल्स हे एकमेव कारण नाही.

 belgaum

खूप लोकांना वाटते की पांढऱ्या डागावर उपचार होऊ शकत नाहीत. ही गंभीर समस्या नाही. परंतू याचा रूग्णाच्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्यांना तणाव वाढतो.
मुळात विटिलिगो आहाराशी संबंधित नाही. तो इम्यून सिंड्रोम आहे, ज्यामुळे पांढरे डाग होण्यास सुरूवात होते. लोकांना विटीलोग कसा होतो हे माहित नाही. लोकसंख्येचा एकूण दीड टक्के लोकांना पांढरे डाग होतात. पण घाबरण्याची गरज नाही, फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कुष्ठरोग आणि कोड यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. तसेच केवळ या दोन कारणांमुळेच त्वचेवर पांढरे डाग पडतात असे नाही. पांढरे डाग येण्याची कारणे अनेक असू शकतात.
उदा. –
* भाजल्यामुळे झालेल्या जखमांचे राहिलेले पांढरे डाग
* रबराच्या/ प्लास्टिकच्या चपला घातल्यामुळे पायावर पडलेले पांढरे डाग. रबर किंवा प्लास्टिकमधील रसायनांमुळे त्वचेला त्रास होण्याची प्रवृत्ती असेल तर असे डाग पडतात.
* महिलांच्या कपाळावर टिकली लावल्यामुळे पडलेले पांढरे डाग. हे डागही टिकली/ बिंदीतील रसायने त्वचेला चालत नसल्यामुळे पडलेले असतात.

त्वचेवर होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळेही त्वचेवर डाग पडतात. याला बोली भाषेत ‘शिबं’ किंवा ‘सुरमा’ म्हणतात. यात रुग्णाची मान, पाठ, छाती, खांदे या ठिकाणी पांढरे अस्पष्ट डाग दिसू लागतात.
* जन्मत:च काही व्यक्तींच्या त्वचेवर पांढरे तीळ असतात. वय वाढत जाते तसा या तीळांचा आकार काहीसा वाढतो.
* इसब या रोगात त्वचा सतत खाजवल्यामुळे पुढे त्या ठिकाणी पांढरे डाग दिसतात. पायांच्या घोटय़ावर इसब होण्याची प्रवृत्ती अधिक असल्याने रुग्णाच्या घोटय़ावर हे डाग दिसतात.
इतर काही आजारांसाठी स्टिरॉइड इंजेक्शने घ्यावी लागली किंवा त्वचेवर मलमे लावावी लागली तर त्यांच्या दुष्परिणामांमुळे काहींना त्वचेवर पांढरे डाग पडतात.
* सतत घट्ट कपडे वापरल्यामुळे कपडय़ांचे त्वचेला घर्षण होऊन त्वचेवर डाग पडतात. नऊवारी साडी वापरणाऱ्या महिलांना कमरेवर साडी घट्ट बांधल्यामुळे कमरेवर पांढरे डाग पडल्याचे मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. आता आपण फक्त कोडाच्या पांढऱ्या डागांचा विचार करूया.

कोड/ श्वेतत्वचा
आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही.
रंगपेशी नष्ट होण्याची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत. अमुक एकाच कारणामुळे रंगपेशी मरतात असे सांगणे कठीण आहे. शरीरावरील पांढऱ्या डागांच्या जागेनुसार कोडाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
जनरलाईझ्ड- अंगावर कुठेही येऊ शकणारे कोड, यात दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर, गुडघ्यांवर समान म्हणजे सिमेट्रिकल डाग दिसू शकतात.White spot skin

* युनिव्हर्सल– अंगावरील सर्व त्वचेवरील रंग हळूहळू निघून जातो आणि त्वचा पांढरी दिसू लागते.
* लोकल- अंगावर एखाद्याच ठिकाणी डाग पडतो.
*  लिप अँड टिप- ओठांवर आणि हातांच्या बोटांवर पांढरे डाग पडतात.
* सेगमेंटल- शरीराच्या एखाद्या पट्टय़ातच पांढरे डाग पडतात पण ते अंगभर पसरत नाहीत.
पांढरे डाग रुग्णांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ लागतात. त्यासाठी कोणतेही बाह्य़ कारण लागत नाही. लहान बाळापासून अगदी वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते.

पण बऱ्याच रुग्णांना आपल्या घरात कुणाला हा आजार होता का, हे सांगता येत नाही. कारण आपल्याला पांढरे डाग आहेत याची वाच्यता करणे सहसा लोक टाळतात.
कोडाच्या डागांवर अनेक उपचार आहेत. डाग येणे आणि पसरणे थांबवणे हा या उपचारांचा पहिला टप्पा असतो. तर दुसऱ्या टप्प्यात श्वेतत्वचेत पुन्हा रंग आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर वरून औषधे लावून, जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते. ‘अल्ट्राव्हायोलेट लाईट थेरपी’त विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा वापर करून डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात. लहान डागांसाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो. डागांवर वरून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वापरली जात आहे.
लग्नाच्या वयातील रुग्णांना शरीराच्या दर्शनी भागात पांढरे डाग असतील तर रुग्ण मुळातच सामाजिक कुचंबणेला सामोरा जात असतो. त्यामुळे उपचारांच्या परिणामांसाठी महिनोंमहिने थांबण्याची अशा रुग्णांची तयारी नसते. डागांवर औषध लावणे, नंतर सूर्यप्रकाशाचा उपचार घेणे या गोष्टी नियमित करणे अनेक जणांना शिक्षण किंवा नोकरी- व्यवसायातील व्यस्ततेमुळे जमत नाही

नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डागांमध्ये हळू- हळू रंग परत येताना दिसतो, डाग वाढणेही थांबते. पण डागांमध्ये रंग येण्यासाठी किती काळ वाट पाहावी यालाही मर्यादा आहेत. उपचार घेऊनही डागांमध्ये रंग येतच नसेल तर तिथे रंगपेशी नाहीत हे स्पष्ट होते. डागांमधील रंगपेशी पूर्णपणे नष्ट झाल्या असतील तर वरून कितीही उपचार केले तरी त्या नव्याने तयार होत नसतात. अशा वेळी त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचे उपचार करता येतात. मात्र त्वचेवर डाग वाढत असतील किंवा पसरत असतील तर मात्र त्यांची वाढ थांबवल्याशिवाय त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचा पर्याय सुचवला जात नाही.
होमिओपथी- पुष्कळ फरक पडतो. परंतु सातत्य आवश्यक असते.
9916106896
9964946918

कोड-पांढरे डाग- काय आहे हा त्वचा रोग यावर उपचार काय काय सांगतात डॉ सोनाली सरनोबत पहा खालील व्हीडिओत

https://www.facebook.com/375504746140458/posts/1325183247839265/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.