Friday, March 29, 2024

/

बेळगाव -जोधपूर विमान सेवेला झाला प्रारंभ : थाटात झाले उद्घाटन

 belgaum

राजस्थानमधील जोधपूर शहराला बेळगावमधून स्टार एअर कंपनीची थेट विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. या विमान सेवेचा उद्घाटन समारंभ आज सकाळी बेळगाव विमानतळावर मोठ्या थाटात पार पडला.

बेळगाव ते जोधपुर थेट विमान सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी स्टार एअर कंपनीने आज मंगळवारी सकाळी बेळगाव विमानतळावर खास तयारी केली होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर संस्कार भारतीतर्फे ईशस्तवन व स्वागतगीत झाले.

बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह फित कापून विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थित जेष्ठ प्रवासी महिलेच्या हस्ते आशीर्वाद म्हणून केक कापण्यात आला. तसेच मौर्य यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते बेळगाव ते जोधपुर विमान प्रवासाचे पहिले तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशाला बोर्डिंग पास प्रदान करण्यात आला. यावेळी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्यासह सदर विमानसेवा सुरू करण्यासाठी ज्यांनी -ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना धन्यवाद देण्यात आले.Bgm jodhpur

 belgaum

याप्रसंगी स्टार एअरवेज दक्षिण भारत प्रबंधक शशिकांत यकर्णल, कोमल जानी, प्रताप देसाई, बेळगाव महानगर भाजप उपाध्यक्ष विक्रमसिंह राजपुरोहित, चंदन पुरोहित, देवराज राजपुरोहित, रामेश्वरलाल भाटी, नरपतसिंग राजपुरोहित आधी बेळगावच्या राजस्थानी व मारवाडी समाजातील मान्यवरांसह स्टार एअरवेजचे अधिकारी-कर्मचारी निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीकडून बेळगाव ते जोधपूर विमान सेवा आजपासून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुरू राहणार आहे. बेळगाव येथून सकाळी 10 वाजता निघालेले विमान दुपारी 12:10 वाजता जोधपूरला पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे जोधपूर येथून दुपारी 12:40 वाजता निघालेले विमान दुपारी 02:50 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. या विमान प्रवासासाठी 3,499 रुपये इतका तिकिटाचा प्राथमिक दर असणार आहे. बेळगाव, कोल्हापूर, हुबळी आणि गोवा या परिसरात मोठ्या प्रमाणात राजस्थानी व मारवाडी समाज व्यवसायानिमित्त वसला आहे. या समाजातील व्यक्तींची नेहमी राजस्थानला ये-जा असते.

बस व रेल्वेने आजवर हे प्रवासी प्रवास करत होते. परंतु विमान सेवा सुरू करण्याची मागणी या दोन्ही समाजांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे केली होती. आता विमान सेवेमुळे बेळगाव शहर परिसरातील राजस्थानी व मारवाडी समाजाकडून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.