काँग्रेसच्यावतीने डी. के. शिवकुमार हे छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत असून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
आज बेळगावमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह बेळगावला आणण्यावरून भाजपावर टीका करणाऱ्या डी. के. शिवकुमार यांना यांना आज रमेश जारकीहोळींनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोविडच्या मार्गसूचीनुसार सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय प्रवण मुखर्जी यांचेही निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोलकाताऐवजी दिल्ली येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यात कोणतेही राजकारण करण्यासारखे कारण नसून डी. के. शिवकुमारांनी संकटकाळात विकास करण्याकडे लक्ष द्यावे, अशा क्षुल्लक गोष्टींवरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डी. के. शिवकुमार काल विधानसभेत काय बोललेत हे सर्वांनाच माहित आहे. कालच्या प्रकारानंतर हताश झालेल्या डीकेशींनी अंगडिंच्या कुटुंबियांसाठी सहानुभूती दाखविण्याची गरज नसून भाजप पक्षात पक्षाच्या सिद्धांतानुसार उमेदवार निवडला जातो. आणि हायकमांड घराणेशाहीपेक्षा पक्षनिष्ठा आणि योग्य उमेदवार निवडीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे हायकमांडचा निर्णय अंतिम राहील. असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर कर्नाटकात ओढवलेल्या पूरपरिस्थितीनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप सिद्धरामय्यांनी केला आहे. शिवाय कोविडकाळात भ्रष्ट्राचार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले कि, या सर्व गोष्टींचे पुरावे विरोधी पक्षाकडे असतील तर त्यांनी ते जरूर सादर करावेत. केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करू नयेत, असे ते म्हणाले.
आज पालकमंत्री रमेश जारकीहोळींनी दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. अंगडिंच्या कुटुंबियांशी आपले जवळचे संबंध असून सुरेश अंगडी, जगदीश शेट्टर आणि आपण एकसंघ होतो परंतु अंगडिंच्या अकाली जाण्याने माझे वैयक्तिक खूप मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.