Thursday, April 25, 2024

/

बेडवेटिंग (अंथरूणात शू करणे)

 belgaum

टेन्शन जसं मोठ्यांना येतं तसं लहानग्यांनासुध्दा येतच असावं, मुलगा किंवा मुलगी दोन अडीच वर्षाची झाल्यावर प्लेगु्रपला जायला लागतात. त्यांच्या छोट्याशा विश्‍वात हा एक मोठाच बदल असतो. दीड ते दोन वर्षाची मुलं शी/शू आल्याचं सांगायला शिकतात. परंतु काही मुलांना मात्र दिवसा होणारी शी/शू नियंत्रित झाली तरी रात्री मात्र झोपेत शू होण्याचा प्रकार काही मुलांच्यात अगदी वयात येईतोपर्यंत चालू राहतो. तेव्हा मात्र आधीच उपचार केले असते तर बरं झालं असतं असं वाटत राहतां. मूत्र विसर्जन क्रियेवर संपूर्णस्वायत्त चेतनसंस्थेचा अंमल चालतो. तान्ह्या बाळांच्यात मूत्राशय भरले की रिकामे करण्याचे संदेश येऊन आपोआपच मूत्रविसर्जन होते. परंतु वयाच्या पाचव्या वर्षापासून संपूर्णतः ऐच्छिक स्नायुंव्दारे नियंत्रण करणे शक्य होते. बेडवेटिंगमध्येही दोन प्रकार असतात. एकतर मूल पहिल्यापासूनच मूत्रविसर्जनक्रिया नियंत्रित करू शकत नाही. दुसरे म्हणजे नियंत्रण करायला शिकल्यानंतर काही वर्षांनी असा त्रास होऊ शकतो. काही मुलांना दिवसाही नकळत लघवी होऊ शकते.

कारणे- 1. नैसर्गिक- निसर्गतःच शारीरिक, बौध्दिक वाढ कमी असणे, आईवडिलांकडून व्यवस्थित मार्गदर्शन न मिळणे, जास्त पाणी पिणे, मूत्राशय लहान असणे, अनुवंशिकता.
2. विकारजन्य- जन्मजात आजार उदा. डायबेटिस, डायबेटिस इनसिपीड्स, मूत्रमार्गदोष, मूत्रमार्गदाह (इन्फेक्शन), चेतनवाहिनी अनियंत्रण, बाह्यमूत्रनलिका अविकसित, चिकटलेली असणे, मूत्रव्दार संकुचित असणे, फेफरे आकडी येण्याचा विकार असणे, मणक्याचे रचनादोष असणे इ.
मानसिक- भीती, असुरक्षितता या भावनांमुळे, भावंडांमधील दुजाभाव, आईवडिलांकडून अपेक्षित प्रेम, आपुलकी, जिव्हाळा न मिळणे किंवा लाडांचा अतिरेक होणे, लक्ष वेधून घेण्याचा वर्तन विकार, औदासिन्य, नैराश्य, घरातील भांडणं वितुष्ट, पालकांमधील बेबनाव या सर्वांची परिणीती बेडवेटिंगमध्ये होऊ शकते.

अनियंत्रित मूत्रविसर्जन या वर्तनविकाराचे सर्वात मोठे कारण मानसिक स्तावरच शोधावे लागते. आताशा तणावजन्य परिस्थितीमुळेच असावे, अशा मुलांचे प्रमाण खूपच वाढले आहे. एकत्र कुटुंब पध्दतीतली कुचंबणा, दुर्लक्ष व विभक्त कुटुंबातला एकटेपणा याचा सुवर्णमध्य या मुलांसाठी साधावा कसा?
उपचार- उपचार करताना मुलाचे व पालकांचे दोघांचेही समुपदेशन करावे लागते.Bed wetting

 belgaum

1. ट्रेनिंग- झोपायला जाण्यापूर्वी मुलाला लघवी करण्याची आठवण करून दिली पाहिजे. रात्रीसुध्दा ठराविक वेळी उठवून लघवी करून आणावे. दिवसा बराचवेळ लघवी नियंत्रण करायला शिकवावे. म्हणजे मूत्राशयाची क्षमता वाढण्यास मदत होते. हे प्रशिक्षण पालकांनी पाल्याला देणे आवश्यक आहे.
2. आजारांचे उपचार- ज्या काही मूलभूत आजारांमुळे हा त्रास होतो आहे, त्याची कारणे शोधून उपचार केले पाहिजेत. उदा. मूत्रमार्गाचे व्दार संकुचित असल्यास शस्त्रक्रियेने ते व्यवस्थित करावे लागते.
3. मानसोपचार- परदेशात अशा मुलांसाठी खास बनवलेले डायपर मिळतात. झोपताना हा डायपर मुलांना घालायचा. लघवीचा एखादासुध्दा थेंब या डायपरवर पडला की त्यात व्हायब्रेट होणारे एक सूचक यंत्र असते. त्याच्यामुळे मुलाला लगेच जाग येते. अशाने मुलांना मूत्रविसर्जन करताना जागे होण्याचे प्रशिक्षण मिळते व या सवयीवर ताबा मिळवता येतो. त्याशिवाय समुपदेशन, संमोहन, प्रशिक्षणानेही फायदा होतो.

4. होमिओपॅथी- होमिओपॅथीमुळे या विकारावर संपूर्ण उपचार शक्य होतात. अशा कित्येक मुलांना या औषधांचा फायदा झालेला आहे. वयात आलेल्या काही मुलामुलींनासुध्दा हा विकार असतो व त्यामुळे फार मोठा मानसिक परिणाम होतो. अवघड समस्या असल्यामुळे पालकही उपचार करवत नाहीत. पण असे करणे चुकीचे असून त्यामुळे मुलांचे खच्चीकरण होऊ शकते. सेपिया, कॉस्टीकम, अ‍ॅसीडबेंझ, क्रियोसोट, एक्कीसेटम सोरीनम, लॅक कॅन, लायकोपोडीयम अशी उत्कृष्ट औषधं वापरता येतात. बायोकेमिक औषधांमध्ये कॅलकेरिया फॉस 6×, कालीफॉस 6×, नॅट्रमफॉस 6× अशी औषधं उपयुक्त आहेत.

डॉ सोनाली सरनोबत

9964946918
9916106896

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.