Thursday, March 28, 2024

/

मणगुत्ती प्रकरणात महाराष्ट्राने नाक खुपसू नये : सतीश जारकीहोळी

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. बेळगाव जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या शिवमूर्तींमध्ये महाराष्ट्राने कोणतेही योगदान दिले नाही, येथील स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्राने नाक खुपसू नये, आणि याचा नैतिक अधिकारही महाराष्ट्राला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी यापासून दूर राहावे, असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.

आज बेळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले कि, बेळगाव जिल्ह्यात भरपूर शिवमूर्ती आहेत. यमकनमर्डी क्षेत्रातील कडोलीमध्ये सुमारे ५० लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी स्वतः त्यात १५ लाख रुपये दिले आहेत. त्यावेळी आम्ही महाराष्ट्राकडे पैसे मागितले होते का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय बेळगावमध्ये अशा छोट्या घटना झाल्यानंतर कोल्हापूरहुन येऊन दगडफेक करण्याची घटना नवी नाही, महाराष्ट्र छोट्या विषयाचे अवडंबर करीत आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

मणगुत्ती येथील ज्येष्ठ नागरीक आणि नेत्यांनी ही स्थानिक समस्या असून आपण त्यावर तोडगा काढू असे सांगितले आहे. शिवाय जिल्हा पोलीस आयुक्तांनीही याठिकाणी भेट देऊन स्थानिक नेत्यांशी सल्लामसलत करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांचे येथे काहीच काम नाही असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.Satish jarkiholi

 belgaum

पूरपरिस्थितीबद्दल चर्चा
पूरपरिस्थितीबद्दल आम्ही जिल्हा प्रशासनाला सल्ला-सूचना दिल्या आहेत. आणि पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये याची काळजी घेण्यासही सांगितले आहे. यापूर्वी पुरामुळे घर गमावलेल्या निर्वासितांना पाच लाखांची भरपाई करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. परंतु अद्याप भरपाई मिळाली नसल्याचा आरोप सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.

सिद्धरामय्या-येडियुरप्पा भेटीबद्दल चर्चा

कोरोनाच्या विळख्यात सापडलेले मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कोरोनावरील उपचारासाठी एकाच रुग्णालयात दाखल आहेत. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले की, राजकारणी 24 तास भांडणेच करत नाहीत. रुग्णालयात एकत्र असल्यामुळे ते एकमेकांशी प्रेमानेही बोलले असतील, एकमेकांच्या तब्येतीची विचारपूसही केली असेल, परंतु राजकीय दृष्टिकोनातून कोणती चर्चा झाली याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला निवय नवलगट्टी, सुनील हनमन्नवर यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते.

2 COMMENTS

  1. सीमाभाग आणि इथली मराठी जनता ह्यांची नाळ आई मुलं सारखी आहे महाराष्ट्र सोबत त्यामुळे त्यांनी काय करावं हे त्यांना समजत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.