Friday, April 26, 2024

/

शहरासाठी साडेपाच कोटीची महत्त्वाकांक्षी “बायसिकल शेअरिंग” योजना!

 belgaum

शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने “बायसिकल शेअरिंग” ही साडेपाच कोटी रुपयांचा आराखडा असणारी महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे. यासंदर्भात महानगरपालिका व स्मार्ट सिटी लिमिटेड यांची लवकरच एक बैठक होणार असून मनपा आयुक्त प्रशासकांची चर्चा करून आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

सदर बायसिकल शेअरिंग योजनेअंतर्गत बेळगाव शहरात नागरिकांसाठी भाडेतत्त्वावर 650 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापैकी 70 टक्के सायकली या सर्वसामान्य नेहमीच्या सायकली असतील आणि उर्वरित 30 टक्के सायकली या ई -सायकली असणार आहेत. यासाठी शहरात 80 ठिकाणी सायकल स्टँड तयार केले जाणार आहेत. सदर बायसिकल शेअरिंग योजना 70 टक्के शासकीय आणि 30 टक्के खाजगी गुंतवणुकीतून राबविली जाणार आहे. यासाठी आवश्यक 70 टक्के निधी राज्याच्या परिवहन विभागाकडून दिला जावा असा प्रस्ताव स्मार्ट सिटी विभागाने मांडला आहे. परिवहन विभागाने हा प्रस्ताव जर अमान्य केला तर स्मार्ट सिटी योजनेतील शिल्लक निधीतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकात म्हैसूर शहरात ही योजना यशस्वी झाली आहे. त्यामुळे ही योजना राबविणारे बेळगाव हे राज्यातील दुसरे शहर ठरणार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ही बायसिकल शेअरिंग योजना तयार करण्यात आली आहे. खरेदी अथवा अन्य कामासाठी बेळगाव शहरात येणार्‍यांना त्यांच्या कामासाठी या सायकलींचा माफक दरात वापर करता येणार आहे. या योजनेसाठी सायकल ट्रॅकची निर्मितीही केली जाणार आहे.

 belgaum

सदर काम प्रगतीपथावर असून हे काम पूर्ण होण्याआधी बायसिकल शेअरिंग योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे. गतवर्षी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने या योजनेबाबत नागरिकांची मते मागवली होती. तेंव्हा बहुतांश नागरिकांनी या योजनेबाबत सकारात्मक मते नोंदवल्यामुळे ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.