Friday, March 29, 2024

/

लैला आणि लॉक डाऊनमधील तिचे तग धरणे

 belgaum

अन्न नाही, पाणी नाही, रस्त्यावर माणसे नाहीत, दिसतात फक्त पोलीस… अशा लॉक डाऊनच्या परिस्थितीत रस्त्याकडेला रहाणारी एक असहाय्य महिला कशी काय तग धरू शकली? हा प्रश्न क्लब रोडवरील रहिवाशांना पडला आहे. जे सिव्हिल हॉस्पिटलनजीक रस्त्याकडेला वास्तव्यास असलेल्या लैला शिंदे हिला गेल्या दीड वर्षापासून पहात आहेत. देवानेच तिला वाचवले असावे अशी त्यांची भावना आहे.

क्लब रोडवरील रहिवाशांच्या माहितीनुसार लैलाने आत्तापर्यंत कोणाकडेच भीक मागितलेली नाही. ती भिकारी नाही, फक्त तिचे थोडे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. घरगुती समस्येमुळे तिला रस्त्यावर यावे लागले आहे. अविवाहित लैलाने आपली माहिती देताना सांगितले की, ती मूळची अनगोळ येथील रहिवासी आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर ती एकाकी पडली, तिला सांभाळणारे कोणीही नव्हते. स्थानिक लोकांनी मला माझ्या घरातून हाकलून लावले शिवाय माघारी परत न येण्याची तंबीही दिली. तेंव्हापासून मी सिव्हिल हॉस्पिटलनजीक रस्त्याशेजारी रहात आहे. मला माझ्या घरी परत जायचे नाही, असे लैला ठामपणे सांगते. लैला रहात असलेल्या रस्त्यावरील एका कॅन्टीन चालकाने तिला रस्त्यावर रहावयास आलेल्या दिवसापासून खाण्यासाठी खाद्य पदार्थ देण्यास सुरूवात केली. रस्त्यावरून जाणारे लोक आणि हॉस्पिटलमध्ये जाणारे तिला खायला देतात. कांही एनजीओ देखील अधून मधून तिच्या पोटापाण्याची व्यवस्था करत असतात. परंतु लॉक डाऊनच्या काळात लैलाची पोटापाण्याची व्यवस्था करण्यास यापैकी कोणीही नव्हते. हा तो कठीण काळ होता ज्याची लैलाने कल्पनाही केली नव्हती. दिवसातून एकदा मिळेल ते खाऊन जगणे हे तिच्यासाठी मोठे आव्हान होते.

Laila hungry belgaum
Laila hungry belgaum

इयत्ता आठवी पास असणारी लैला सांगते की, लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी पोलीस रस्त्याच्या कडेला बसलेल्या माझ्याकडे कानाडोळा करून दिसेल त्या सर्वांना पिटाळून लावत होते. मला पाहिले नसल्यासारखे करून ते आपले कर्तव्य बजावत होते. त्याकाळात भूक विसरण्यासाठी मी सतत पाणी पीत होते आणि पुस्तक वाचत होते. परंतु जेंव्हा भूक असह्य होऊ लागली तेंव्हा एक महिला माझ्याकडे आली आणि तिने मला खावयास दिले. तेंव्हा माझ्या जीवात जीव आला. तथापि आजचा दिवस गेला उद्याचे काय? हा प्रश्न होताच. दिवस उलटत गेले कळत नव्हते की ही परिस्थिती ती किती दिवस अशीच राहणार. त्याकाळात पावसाने झोडपले तेव्हा लैलाने सिव्हील हॉस्पिटल आवारातील टू व्हिलर पार्किंग शेडचा आसरा घेतला. तेंव्हा अनोळखी लोक येऊन तिला खाण्यासाठी कांही ना कांही देऊन जात होते. ज्याची तिने अपेक्षाही केली नव्हती आणि एके दिवशी काही दुकाने उघडल्याचे तिच्या निदर्शनास आले. माझा जवळ बचत केलेले 27 रुपये होते. मी ठरवलं की असे कांहीतरी खाण्यासाठी घ्यायचे की जे बरेच दिवस टिकेल. जेणेकरून पुन्हा उपाशी राहण्याची वेळ आली तर त्याचा उपयोग होईल. तेंव्हा मी 5 रुपयांचे चिरमुरे खरेदी केले. त्यावेळी दुकानदाराने मला आणखी जादा चिरमुरे देऊन ठेवून घे याची तुला गरज लागेल, असे सांगितले.

 belgaum

अल्पावधीत मार्केट पुन्हा बंद झाले परंतु यावेळी लैला त्यासाठी तयार होती. आश्चर्य म्हणजे परिसरातील नागरिक पुन्हा तिच्याकडे येऊन तिला कांही ना कांही खायला देऊ लागले. तेंव्हा मला वाटले की देव फक्त दररोज खायला देणाऱ्या त्या कॅन्टीनवाल्यामध्ये नाही तर तो कोणत्याही स्वरूपात येऊन आपल्या भक्ताची मदत करत असतो. लॉक डाऊनच्या काळात ज्यांनी-ज्यांनी मला उदरनिर्वाहासाठी मदत केली ते सर्वजण मला देवासारखेच आहेत, असे लैला शिंदे हिने शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.