केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या आदेशावरून देशव्यापी लाॅक डाऊन मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून आज शनिवार दि. 30 मे 2020 रोजी नवी मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही परवानगी, मंजुरी अथवा परमिट विना नागरिकांना आणि मालवाहतूकीला मुक्तसंचाराची अनुमती असणार आहे. त्याचप्रमाणे रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची देशव्यापी संचारबंदी असणार असून मंदिरे, प्रार्थनास्थळे, हॉटेल्स, मॉल्स वगैरे सर्व येत्या 8 जूनपासून खुले करण्यास अनुमती असणार आहे.
देशव्यापी लॉक डाऊन 8 जूनपासून मागे घेतला जाणार असून त्यानंतर लाॅक डाऊन फक्त कंटेनमेंट झोनसाठी मर्यादित राहील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या सभांवरील बंदी मात्र कायम असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विहित केलेल्या मानक प्रणालीच्या (एसओपी) पहिल्या टप्प्यात म्हणजे येत्या 8 जून 2020 पासून पुढील गोष्टींना परवानगी असणार आहे. 1) सार्वजनिकांसाठीची धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे खुली करणे, 2) हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा, 3) शॉपिंग मॉल्स. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित सर्व ठिकाणी सामाजिक अंतरासह अन्य नियमांचे पालन केले जावे.
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे येत्या जुलैमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळा-कॉलेजेस शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी. यासंदर्भात राज्य व केंद्रशासित प्रदेश संस्था पातळीवर पालकांनी भागधारकांची चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या अभिप्रायावर संबंधित संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेतला जावा. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित सर्व ठिकाणी सामाजिक अंतरासह अन्य नियमांचे पालन केले जावे.
तिसऱ्या टप्प्यामध्ये परिस्थितीचे मुल्यांकन करून पुढील गोष्टी पुनश्च सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 1) आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, 2) मेट्रो रेल्वे, 3) चित्रपटगृहे, जिम्नॅशियम, स्विमिंगपूल्स, इंटरटेनमेंट पार्क, नाट्यगृहे, सभाग्रहांसारखी अन्य स्थळे, 4) सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजन शैक्षणिक संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमांसह अन्य भव्य कार्यक्रम आणि सभा.
नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) : अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असेल. यासाठी कायद्यातील भादवि कलम 144 सारख्या योग्य तरतुदींचा वापर करून स्थानिक प्रशासन आपल्या कार्यक्षेत्रात या आदेशाची अंमलबजावणी करू शकतात.
देशातील कंटेनमेंट झोन्समध्ये येत्या 30 जून 2020 पर्यंत लॉक डाऊन कायम असेल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित जिल्हा प्रशासन कंटेनमेंट झोनचे सीमांकन करू शकतात. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल. नागरिकांना कंटेनमेंट झोनची सीमा ओलांडण्यास सक्त बंदी असेल. कोरोना कॉन्टॅक्ट शोधण्यासाठी प्रत्येक घरावर सक्त नजर ठेवली जावी. घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जावी. बफर झोनवर विशेष लक्ष ठेवले जावे.
नागरिकांच्या व मालवाहतूकदारांच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मुक्त संचाराला परवानगी असेल. यासाठी वेगळी परवानगी मंजुरी अथवा ई -परमिटची गरज लागणार नाही.
कोव्हीड – 19 व्यवस्थापनासाठीचे राष्ट्रीय निर्देश : सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासाच्या वेळी तोंडावर मास्क वापरणे बंधनकारक. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने 6फुट फूट (दो गज की दूरी) सामाजिक अंतराचे पालन करावे. दुकानातील ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर असावे आणि पाच पेक्षा जास्त लोक दुकानात असू नयेत. मेळावे, मोठे कार्यक्रम, सभा आदींवरील बंदी कायम असेल. लग्नसमारंभात सारख्या कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये अंत्यसंस्कार अथवा अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय असेल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू सेवनावर बंदी असेल. कार्यालय, वर्कशॉप, दुकाने, मार्केट, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम केले जावे, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाच्या नियमाचे पालन केले जावे, सामाजिक अंतर पाळले जावे.