Thursday, April 25, 2024

/

चौथ्या टप्प्यात विशिष्ट निर्बंधित बाबी वगळता उर्वरित सर्व व्यवहार राहणार खुले

 belgaum

देशातील येत्या 31 मे 2020 पर्यंत जारी करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनची मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचीनुसार विशिष्ट निर्बंधित बाबी वगळता उर्वरित सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनच्या मार्गदर्शक सूचीनुसार स्थानिक वैद्यकीय सेवा, एअर ॲम्बुलन्स आणि सुरक्षा संदर्भातील सेवा वगळता स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर 31 मेपर्यंत निर्बंध असणार आहे. मेट्रो रेल्वेसेवा, शाळा – कॉलेजेस/ शैक्षणिक/ प्रशिक्षण/ शिकवण्या घेणाऱ्या संस्था बंद राहतील. मात्र ऑनलाइन / अंतर ठेवून शिक्षण घेण्यास परवानगी असणार आहे. निवासी आरोग्य/ पोलीस /सरकारी अधिकारी /आरोग्य कर्मचारी/ पर्यटकांसाठीची सोय/ कोरन्टाईन सुविधा आणि बसस्थानक रेल्वेस्थानक, विमानतळानजीकची कॅन्टीन वगळता हॉटेल रेस्टॉरंट आणि अन्य आदरातिथ्य सेवांवर निर्बंध असतील. रेस्टॉरंट फक्त घरपोच सेवेसाठी खुली ठेवता येतील.

सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्यगृहे, बार आणि सभागृह सारख्या जागा बंद राहतील. क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुले ठेवण्यास परवानगी असली तरी प्रेक्षकांना त्या ठिकाणी बंदी असणार आहे. सामाजिक, राजकीय क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक यासंदर्भातील मोठ्या संख्येने नागरिक जमा होतील अशा कार्यक्रमांवर निर्बंध असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद राहतील. धार्मिक सभा घेण्यास सक्त बंदी असणार आहे.

 belgaum

लॉक डाऊनच्या काळात दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्‍यक व्यवहार वगळता संचारबंदी लागू असेल. आंतरराज्य प्रवासी वाहतुकीस परवानगी असणार आहे. बससेवा उभय राज्यांच्या परवानगीने सुरू करता येईल. रेड झोन, ऑरेंज झोन, कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या सीमा जिल्हा प्रशासनाने निश्चित करावयाच्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक सेवेला परवानगी असली तरी तातडीची वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला या झोनच्या परिमिती आत अथवा बाहेर ये-जा करण्यास सक्त बंदी असेल.

लॉक डाऊन काळात 65 वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडणीय असणार आहे. सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. लग्नसमारंभात सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच 50 पेक्षा जास्त पाहुणे असू नयेत. अंत्यसंस्कार व अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये.

सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू आदींच्या सेवनावर बंदी असणार आहे. दुकानासमोर ग्राहकांमध्ये 6 फुटाचे अंतर असावे आणि दुकानांमध्ये 6 पेक्षा जास्त लोक असू नयेत. कार्यालय कामाचे ठिकाण दुकाने मार्केट औद्योगिक आणि व्यापारी आस्थापने या ठिकाणच्या प्रवेशद्वार व प्रस्थानाच्या जागी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनीटायझरची व्यवस्था असावी. कार्यालय आणि कामाच्या जागेचे सातत्याने निर्जंतुकीकरण केले जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.