Thursday, April 25, 2024

/

कोरोना”ला रोखण्यासाठी अशीही नाका-बंदी

 belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात देशाला उद्देशून काल मंगळवारी केलेल्या भाषणाचा किती मोठा प्रभाव जनमानसावर पडला आहे. याची प्रचिती बुधवारी बेळगाव तालुक्यातील कांही गावामध्ये आली. तालुक्यातील येळ्ळूरसह अन्य कांही गावातील नागरिकांनी विशेषता युवापिढीने कोरोनाचे संक्रमण आपल्या गावांमध्ये होऊ नये यासाठी बुधवारी सकाळी तोडलेली झाडे टाकून गावाचे मुख्य रस्तेच बंद करून टाकले आहेत.

विदेशातून अथवा परगावाहून आलेल्या नागरिकांद्वारे प्राणघातक कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे आढळून आले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 21 दिवस देशातील जनतेला घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना प्रादुर्भाव झालेल्या शहरातील मंडळी आता गावाकडील आपल्या घरांकडे धाव घेऊ लागली आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन येळ्ळूर येथील सुमारे 30 – 40 युवकांनी आज बुधवारी सकाळी तोडलेली झाडे टाकून गावाकडे येणारे प्रमुख रस्तेच बंद केले. युवकांनी स्वयंस्फूर्तीने वडगाव ते येळ्ळूर, खानापूर ते येळ्ळूर आणि केकेकोप्प, नागेनहट्टी, येरमाळ येथून येळ्ळूरकडे येणारा मार्ग असे तीनही रस्ते तोडलेली झाडे व झाडांचे बुंधे टाकून बंद करण्याबरोबरच परगावाहून येणाऱ्या ट्रक, टेम्पो, डंपर आदी वाहनांना माघारी धाडले. वडगाव – येळ्ळूर मुख्य मार्गापासून कांही अंतरावर असलेला बायपास रोड मात्र गावातील लोकांसाठी तसेच दूध, रेशन आदी जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी तसेच रुग्णसेवेसाठी खुला ठेवण्यात आला आहे. हा मार्ग ज्या गल्लीतून जातो त्या गल्लीतील लोकांना परगावच्या व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नका, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.

Entry close yellur
Yellur बेनकन halli entry close

परगावात वास्तव्य करून आलेल्या लोकांकडून येळ्ळूर गावामध्ये “कोरोना”चा धोका निर्माण होऊ नये यासाठी आता किमान आठवडाभर तरी येळ्ळूरकडे जाणारे सर्व रस्ते अशा पद्धतीने झाडे टाकून परगावच्या वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासन व पोलिस खाते आपल्या परीने कोरोना विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेंव्हा त्यांना सहकार्य करण्यासाठी आंम्ही देखील आमच्या परिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहोत, असे येळ्ळूरच्या कांही युवा नेत्यांनी “बेळगाव लाईव्ह” ला सांगितले.

 belgaum

दरम्यान येळ्ळूरप्रमाणे तालुक्‍याथील बेळगुंदी, अवचारहट्टी, देसूर आदी गावातील गावकरी व युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावांकडे येणारे प्रमुख रस्ते येळ्ळूरप्रमाणे झाडे व झाडाचे बुंदे टाकून परगावच्या नागरिकांसाठी आणि अनावश्यक वाहतुकीसाठी बंद केले असल्याचे समजते. बेळगुंदी रोडवर केईबी कार्यालयानजीक रस्त्यावर झाडाचे बुंधे टाकून वाहतूक बंद करण्यात आली आहे. एकंदर बेळगाव ग्रामीण भागातील जनता आता कोरोनाच्या बाबतीत सावध झाली असून त्यांनी आपल्या परीने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.