बेळगाव सांबरा विमानतळाच्या विकासार्थ या ठिकाणाहून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू केल्या जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आजपासून बेळगाव – तिरुपती आणि बेळगाव – म्हैसूर अशा नव्या विमान सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
सांबरा विमानतळ येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित खास समारंभात प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्या हस्ते या नव्या विमानसेवा दीपप्रज्वलनाद्वारे लोकार्पण करण्यात आल्या. याप्रसंगी सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह विमानतळाचे अन्य अधिकारी आणि शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बेळगाववरून तिरुपतीसाठी विमानसेवा सुरु करण्यात यावी अशी बेळगावसह परिसरातील प्रवाशांची बर्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार ही विमानसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.
बेळगाव ते तिरुपती विमान सकाळी 07:30 वाजता बेळगावहून सुटणार असून ते सुरू तिरुपतीला 09:15 वाजता पोचणार आहे. त्यानंतर तिरुपतीहून सायंकाळी 06:50 वाजता हे विमान निघून सायंकाळी 07:50 वाजता बेळगावला पोचणार आहे. बेळगाव ते म्हैसूर विमान सकाळी 09:35 वाजता बेळगावहून सुटून 11 वाजता म्हैसूरला पोहोचणार आहे. त्यानंतर हेच विमान म्हैसूरहून सकाळी 11:20 वाजता सुटून बेळगावला दुपारी 12:45 वाजता पोहोचणार आहे.