सीमा भागातील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि पत्रकार मंगेश चिवटे यांना निमंत्रित करण्यात आले होते .मात्र ते बेळगावात आले असता पोलिसांनी त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
महाराष्ट्रातील हे नेते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात येणार होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध लादल्यामुळे त्यांना कोगनोळी येथून माघारी जावे लागले होते. मात्र सीमा बांधवावरील वरील प्रेमापोटी त्यांनी गनिमी कावा करत थेट बेळगाव गाठले.तसेच यापूर्वी झालेल्या अनेक गनिमी काव्याच्या प्रसंगांची आठवण पुन्हा ताजी केली .
आपल्या वाहनांमधून येण्यासाठी पोलीस मज्जाव करतात हे लक्षात आल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चक्क कोगनोळी ते बेळगाव असा प्रवास राज्य परिवहन मंडळाच्या बसने केला.तसेच मंगेश चिवटे आणि इतर काही सहकारी हे देखील अशाच पद्धतीने बेळगावात दाखल झाले.
गनिमी कावा करत एसटी ने प्रवास करून राज्यमंत्री राजेंद्र पाटील हे बेळगावात दाखल झाले. एसटी बसची कोगनोळी येथे तपासणी होऊनही पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी ठरले. बेळगावात प्रवेश केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.हा गनिमी कावा करण्यात आपण काही विशेष केलेले नाही.
सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानापेक्षा माझेहे धाडस खूपच कमी आहे. राज्य सरकार सीमा बांधवांच्या पाठीशी आहे हा संदेश घेऊन आपणबेळगावात आल्याचे त्यांनी नमूद केले.मात्र हुतात्मा अभिवादन कार्यक्रमानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात नेले तसेच दुपारनंतर त्यांची मुक्तता केली.