Wednesday, April 24, 2024

/

खानापूर तालुक्यांमध्ये वाघाची दहशत

 belgaum

खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशानजीकच्या कणकुंबी, जांबोटी, हेमाडगा आदी गावांच्या परिसरात कांही स्थानिक लोकांनी अलीकडे वाघाच्या हालचाली पाहिल्याचा दावा केल्यामुळे संबंधित गावांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनखात्याकडून तो वाघ नसल्याचा दावा केला जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

जांबोटी कणकुंबी, गोल्याळी, हेमाडगा, नागरगाळी आदी परिसरातील मानव वसाहतीमध्ये आणि तिच्या आसपास वाघाचा वावर सुरू झाला आहे. जो अत्यंत अनैसर्गिक आणि धोकादायक आहे. हेमाडगा येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रानटी मांजराने जवळपास 25 हून अधिक जनावरांचा फडशा पाडला आहे. सदर रानटी मांजर हे वाघच असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. तथापि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र ते रानटी मांजर वाघ नसून बिबट्या असल्याचे सांगितले आहे. ग्रामस्थांना खात्री आहे की तो वाघच आहे, कारण त्याने जनावरांना ठार मारल्यानंतर त्यांचा मागमूसही मागे ठेवलेला नाही.

नागरगाळी नजीकच्या कोसकोप्प गवळीवाडा येथे वाघाने मनुष्य वसाहतीत शिरून उपस्थित लोकांसमोरच शेळीचा बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. कोसकोप्प गवळीवाडा येथे गेल्या 23 डिसेंबर रोजी एक गवळी कुटुंब सकाळी न्याहरी करत असताना त्यांच्यासमोर गोठ्यात बांधलेल्या शेळीला एका धिप्पाड वाघाने ठार मारले. त्यानंतर तो वाघ शांतपणे त्या गवळी कुटुंबियांच्या डोळ्याला डोळे भिडवून शेळीचे रक्त पित होता. त्या गवळी कुटुंबाने देखील तो 100 टक्के वाघाच होता असे सांगितले आहे.

 belgaum
Tiger
Tiger

हेमाडगा येथील प्रवीण पाटील आणि नारायण तिनेकर या दोघांनी हेमाडगा गावाजवळ वाघ पाहिला असल्‍याचा दावा केला आहे. सदर वाघ अत्यंत क्रूर आणि धिप्पाड दिसत होता असेही त्यांनी सांगितले. आम्ही लहानाचे मोठे जंगलातच झालो आहोत त्यामुळे बिबट्या आणि वाघ यांच्यातील फरक आम्हाला चांगलाच माहित आहे. आम्ही जे रानटी मांजर पाहिलं तो वाघच होता असेही या उभयतांनी खात्रीपूर्वक सांगितले आहे.

स्थानिक रहिवासी आणि आणि माजी तालुका पंचायत सदस्य विजय मादार यांनी संबंधित रानटी मांजराचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून हेमाडगा गावानजीक वाघाने अलीकडेच एका रेड्याला ठार मारल्याचे सांगितले. एखाद्या रेड्याला ठार मारून त्याला जंगलात घेऊन जाणे हे बिबट्याला शक्य नाही. शोधून काढलेल्या मृत रेड्याच्या अवशेषावरून ते काम वाघाचेच आहे असेही मादार यांनी सांगितले.

दरम्यान या संदर्भात वनखात्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही समाजकंटकांकडून अफवा पसरवून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरविण्याचे काम केले जात आहे असे सांगण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी ज्या ज्या ठिकाणी वाघाचा वावर असल्याचे सांगितले आहे त्या त्या ठिकाणी केंव्हाच कॅमेरे बसून वाघाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे असेही वनखात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.