128 जवानांनी घेतली मायभूमीची सेवा आणि रक्षणाची शपथ

0
 belgaum

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 1/19 ग्रुपच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 128 जवानांचा दीक्षांत समारंभ आज सकाळी शिस्तबद्धतेने मोठ्या दिमाखात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण करणारे हे सर्व जवान आता देशाच्या विविध भागात देशसेवेसाठी रुजू होणार आहेत.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परेड मैदानावर आज शनिवारी सकाळी या दिमाखदार दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून एमएलआयआरसीचे डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम उपस्थित होते. प्रारंभी रिक्रुट दुधाळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली वाद्यवृंदाच्या तालावर शिस्तबद्ध संचलनाव्दारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम यांनी परेडची पाहणी केली. मेजर अब्दुल हमीद हे परेड अॅडजुटंट होते. त्यानंतर उपस्थित 128 जवानांनी तिरंग्याच्या साक्षीने आपल्या जीवाचे मोल देऊन मायभूमीच्या सेवेची आणि संरक्षणाची शपथ घेतली.

bg

प्रमुख पाहुणे डेप्युटी कमांडंट कर्नल जयराम यांनी आपल्या भाषणात उपस्थित जवानांना मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या प्रेरणादायी  गौरवशाली परंपरेची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे जीवनातील आरोग्याचे आणि शिस्तीचे महत्व विशद केले, तसेच जवानांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mlirc
Mlirc

प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या जवानांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक विजेत्या जवानांची नावे पुढील प्रमाणे – अवांतर उपक्रमांसाठीचे पारितोषिक रिक्रुट अक्षय श्रीकांत माने, नामदेव जाधव मेडल व ट्रॉफी रिक्रुट अजय पाठारे, सुचा सिंग मेमोरियल कप रिक्रुट सागर महाजन, कर्नल नायर मेडल रेक्रूट रंजीत कोरमल, मेजर एस. एस. ब्रार मेडल रिक्रुट तुषार किंजाळे, सुभेदार ऑनररी कॅप्टन केशवराव तळेकर मेडल व ट्रॉफी रिक्रुट दुधाळ भागवत.

सदर दीक्षांत समारंभास निमंत्रित पाहुणे यांसह लष्करातील विविध हुद्द्यावरील अधिकारी, जवान, दीक्षांत विधीत सहभागी जवानांचे नातेवाईक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.