Tuesday, April 16, 2024

/

अंगडीजी अभिनंदन, काम व्हावे हीच अपेक्षा!

 belgaum

माननीय खासदार आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील राज्य मंत्री म्हणून आज शपथ घेत असलेले माननीय  सुरेश अंगडी जी, आपले त्रिवार अभिनंदन…..

आपण नशीबवान आहात बेळगाव लोकसभा मतदारसंघात आपण चौथ्यांदा खासदार म्हणून विजयी झालात, चौथ्यांदा खासदार पदाची माळ मिळाल्यामुळे मोदीजींनीही तुमची दखल घेतली आणि तुम्हाला खास फोन करून आज दिल्ली येथे बोलावून घेतले आहे. त्याठिकाणी जाऊन आपण आज  मंत्रिपदाची शपथ घ्याल, तुम्हाला एखाद्या राज्य दर्जाचे मंत्रीपद मिळेल हे सारे बेळगाव साठी अभिमानास्पद असले तरी फक्त नशिबवान म्हणून गप्प न राहता आता चौथ्या टर्ममध्ये तरी काम करा हीच अपेक्षा आहे. बेळगाव लाईव्ह हे एक समाज माध्यम आहे. समाजातील लोकांना काय वाटते याचा वेध घेऊन ते मांडणे हे आमचे काम. आज बेळगावकर द्विधा मनस्थितीत आहेत. पहिली मनस्थिती आहे ती अभिनंदनाची. कारण बेळगाव जिल्ह्याला  मंत्री पद मिळणे हे तसे अभिमानाचेच. पण ते तुम्हाला मिळाले हे बऱ्याच जणांना रुचलेले दिसत नाही. कारण तुम्ही सलग तीन टर्म काहीच काम केले नाही, तुम्हाला मंत्रिपद मिळाले याबद्दल कुणालाही वाईट वाटत नाही किंवा पोट दुखी म्हणून कोणी बोलत नाही तर आपण काम केलं नाही आपला प्रभाव पडू शकला नाही यामुळेच हा विरोध आहे.

सोशल मीडियावर बेळगाव लाईव्हने सर्वप्रथम बातमी टाकली आणि अनेक तिखट प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळाल्या. खासदार सुरेश अंगडी यांना मंत्रिपद देऊन काय उपयोग किंवा त्यांना मिस्टर इंडिया कॅबिनेट द्या या प्रकारच्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही व्यथित झालो ,आम्हाला तुमचे अभिनंदन करायचे होते, तुम्हाला मंत्रिपद मिळाले याबद्दल सर्वप्रथम आमचे पेज आणि वेबसाईट फॉलो करणाऱ्या प्रत्येकालाच कळवायचे होते, मात्र हे कळाल्यानंतर प्रत्येकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहिली तर त्यांचे काय चुकले आहे असे वाटत नाही.
अंगडीजी आता आपण आत्मपरीक्षण करायला हवे पहिल्यांदा तुम्ही निवडून आला ज्येष्ठ दिवंगत नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या लाटेवर त्यांच्या त्या लाटेत तुम्ही स्वार झालात आणि पहिल्यांदा खासदार झालात.

 belgaum

suresh angadi mp

त्यावेळी भाजपचे खासदार पदाचे उमेदवार वेगळेच होते. त्यांनी नकार दिल्यामुळे उमेदवारी तुमच्या गळ्यात पडली. अटल बिहारी वाजपेयी बेळगावला प्रचारासाठी आले आणि त्यात तुम्ही बाजी मारली. तुम्ही पहिल्यांदा खासदार झालात. तुमची प्रतिमा स्वच्छ आहे. तुमचा चेहरा साफ आहे. त्यामुळे लोकांनी अपेक्षा ठेवल्या त्या पहिल्या टर्ममध्ये पूर्ण झाल्या नाहीत. त्यानंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले पण कर्नाटक राज्यात भाजपची प्रतिमा चांगली होती .भाजपचे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या लाटेवर स्वार होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात. चौथ्यांदा नरेंद्र मोदी सरकारची मदत म्हणण्यापेक्षा मोदींची लाट तुम्हाला महत्त्वाची पडली. आणि त्या लाटेवर तुम्ही पुन्हा एकदा निवडून आलात.

खरे तर तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदी यांचीच लाट तुम्हाला उपयोगात आली.केंद्रात नरेंद्र मोदी यांचे प्रभावी सरकार असताना आणि मोदीजींनी प्रत्येक खासदारांनी प्रभावीपणे वागावे, आपल्या भागात विकास करावा अशी अट घातलेली असतानाही तुम्ही पाच वर्षे शांत राहिलात त्यामुळे जनतेत क्षोभ होता, या वेळी तुम्हाला उमेदवारी मिळू नये म्हणून तुमच्या पक्षातल्या लोकांनी प्रयत्न केले, पण तरीही तुम्ही विद्यमान खासदार होता त्यामुळे तुम्हाला तिकीट देण्यात आले आणि आता तर सर्वात मोठी जबाबदारी म्हणून कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा तुम्हाला मिळत आहे ,त्यामुळे आता एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून काहीतरी ठोस आणि भरीव काम करण्याची. बेळगावातील सर्व भाषिक मतदारांनी तुम्हाला मतदान केले आहे यामुळे तर तुम्ही निवडून आला .तीन लाखाचे लीड ही साधी गोष्ट नाही .काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही पाणी पाजले पण हे सारे तुमच्या जीवावर नाही, तर मोदींच्या जीवावर. आणि प्रचारात तुम्ही स्वतः सांगत होतात माझ्याकडे बघून मत देऊ नका, मोदींकडे पाहून मत द्या आता लोकांनी मोदींकडे पाहून मत दिले आणि मोदीजींनी मतदारांकडे पाहून त्यांनी दिलेल्या बहुमताच्या जोरावर तुम्हाला मंत्री पद देऊ केले आहे, याचे भान पुढील पाच वर्षात तुम्ही राखाल ही अपेक्षा व्यक्त करतो.

मंत्रीपद घेऊन बेळगावला आल्यानंतर आपण अवश्य बोलवाल आणि पुढील पाच वर्षाची तुमची योजना काय आहे? बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार यासाठी मुलाखत द्याल, हीच अपेक्षा.

खासदार अंगडी यांना वैयक्तिक स्वरूपात कोणाचाही विरोध नाही, ते मंत्री झाले त्याचा आनंद मानावा तितका थोडा आहे. मात्र त्यांच्या खासदारकीचा आणि त्यांच्या मंत्रिपदाचा बेळगावच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला उपयोग व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली आणि त्यात काही चुकले तर क्षमा असावी.
भरीव काम कराल हीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.