Friday, March 29, 2024

/

कंपवात व होमिओपथी

 belgaum

उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्‍नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात.

हा रोग ५० ते ७० वर्षे वयाच्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. स्‍नायू व तंत्रिका (मज्जातंतू) यांमध्ये बाह्यतः काही विकृती दिसत नाही. मरणोत्तर परीक्षेत अग्रमस्तिष्काच्या (मेंदूच्या पुढच्या भागाच्या) तळाशी असलेल्या केंद्रातील कोशिकांचा (पेशींचा) नाश होऊन या जागी तंतुमय ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) उत्पन्न झालेले दिसते. या रोगाचे मूळ कारण अजून निश्चितपणे कळलेले नाही. मात्र आनुवंशिकता नसते असे दिसते.

लक्षणेही इतक्या हळूहळू सुरू होतात की, पहिले लक्षण केव्हा दिसून आले ते लक्षातही येत नाही. सुरुवातीस स्‍नायू घट्ट व ताठ होऊन त्यांच्या हालचालीस विलंब लागतो. मानेतील व चेहऱ्यावरील स्‍नायूंवर अधिक परिणाम झालेला दिसतो. त्या मानाने हातापायांच्या स्‍नायूंना येणारा ताठरपणा कमी असतो. चेहऱ्याचे स्‍नायू ताठर व घट्ट झाल्यामुळे चेहरा मुखवटा बसविल्यासारखा दिसतो. चेहऱ्यावर भावनांचा आविष्कार दिसत नाही. मात्र बुद्धी व भावना कमी झालेल्या नसतात. चेहरा तुळतुळीत व रेषाहीन दिसतो. स्वरयंत्राच्या स्‍नायूंच्या ताठरपणामुळे आवाज कंटाळवाणा व एकच एक स्वरात येतो. त्यामुळे बोलताना आवाज वरखाली होण्याची क्रिया नाहीशी होते. बोलताना वाक्ये एकात एक घोटाळल्यासारखी, एकसुरी येतात. कित्येक वेळा लाळ गळत राहते.

 belgaum

मान, छाती वगैरे ठिकाणचे स्‍नायू ताठ झाल्यामुळे व त्यांच हालचालही मंद झाल्यामुळे रोगी एखाद्या पुतळ्यासारखा दिसतो. एका बाजूला पहावयाचे असल्यास मान वळवून पाहण्याऐवजी सर्व शरीरच वळवून पहातो. मान पुढे झुकल्यासारखी होते. सर्व शरीरच पुढच्या बाजूस वाकल्यासारखे होते. चालण्याची पद्धतही विशेष लक्षात येण्यासारखी असते. सर्व शरीर व मान पुढे झुकल्यासारखी असून दर पावलागणीक होणारी, हाताची पुढेमागे होणारी हालचाल बंद पडते. पावले अगदी जवळजवळ पडतात. एका हातात ताठरपणा जास्त असल्यामुळे तो हात पुढे झुकल्यासारखा व त्याच्या बोटांमध्ये सतत चालू असलेला कंप हे चित्र कायम लक्षात राहण्यासारखे असते.

कंपाची सुरुवात प्रथम हातांच्या बोटांमध्ये होऊन पुढे तो शरीरातील सर्व स्‍नायूंत पसरतो. प्रथम प्रथम कंप फक्त मानसिक अस्वस्थता असताना दिसतो पण पुढे तो जागेपणी कायमच राहतो. हाताचा अंगठा बाकीच्या चारी बोटांना लागून सारखा मागेपुढे होत राहतो. जणू काहीहाताने गोळ्या वळीत असल्यासारखा हा कंप असतो. प्रगत अवस्थेत कंप सर्व शरीरभर पसरतो. झोपेत मात्र कंप अजिबात थांबतो. कुशीवर वळण्यास अडचण वाटते. अशक्तपणा, सर्वांगात जडपणा ही लक्षणेही दिसतात. संवेदना व मानसिक क्रियेमध्ये विचारशक्ती व बुद्धी यांमध्ये मात्र विशेष फरक दिसत नाही. हातपाय कधीकधी गार पडल्यासारखे वाटतात. हवेतील तपमानातील फरक सोसवत नाही.
निदाननिर्विकार चेहरा, चालण्याची व बोलण्याची पद्धत व कंप ही लक्षणे इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहेत की निदान सोपे होते. मात्र रोगाच्या सुरुवातीस निदान करणे थोडे प्रयासाचे आहे. चिकित्सारोग असाध्य असला तरी ब गटातील जीवनसत्त्वे व मालिश, योग्य आहार व व्यायाम दिला असता जीवन पुष्कळ सुसह्य होते. बेलाडोना व धोतरा या जातींच्या औषधांचा उपयोग कंप कमी करण्याकडे होतो. तसेच बेंझोक्सॉल, प्रोसायक्लिडीन वगैरे औषधांची मात्रा हळूहळू वाढवीत दिल्याने परिणाम होतो. झोपेत कंप नसल्यामुळे औषधांचा परिणाम दिवसा होईल अशी वेळ पाहून औषध द्यावे लागते.
मस्तिष्कातील शुभ्रतंतू छेदन (मेंदूच्या पुढील भागाच्या लंबवर्तुळाकार केंद्रातील पांढरा भाग कापण्याची शस्त्रक्रिया) या नावाची शस्त्रक्रिया केल्याने काही प्रमाणात चांगला उपयोग होऊ शकतो असा अनुभव आहे.

होमिओपथी
या औषधांनी हा आजार बराच कंट्रोल मधे राहू शकतो. प्लंबम मेट, आॅरम मेट, अगॅरिकस अशी औषंधे उपयुक्त असतात.
वैद्यकिय सल्यानेच उपचार घ्यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.