Friday, April 26, 2024

/

दादांचे आता “नानु अवनू अल्ला” ( तो मी नव्हेच)

 belgaum

सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आता तो मी नव्हेच अर्थात प्रभाकर पणशीकरांचा “नानु अवनू अल्ला” हा राग आळवण्यास सुरुवात केली आहे. सीमावासीयांच्या जखमेवरील खपली काढण्याच्या त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश सर्वप्रथम बेळगाव live ने केला होता, त्यानंतर संपूर्ण सीमाभाग आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर दादांनी रात्री बेळगाव live शी संपर्क साधला, त्यावेळी आपण असे बोललोच नव्हतो, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण इतके गंभिर होईल याची आम्हाला कल्पना नव्हती असेही दादा बेजबाबदारपणे म्हणाले.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक  मधील मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून “जन्मले तर कर्नाटक मध्येच जन्मांवे”(हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकु) अस गाणं म्हणून उपस्थितांना खुश करण्याचा प्रयत्न दादांनी केला होता.

हा व्हिडिओ उपलब्ध झाल्यावर बेळगाव live ने रविवारी सकाळी १० वाजता पुराव्यानीशी त्याचा पर्दाफाश केला होता. यानंतर अर्धा तासातच महाराष्ट्रातील माध्यमे दादांवर तुटून पडली.
गोकाकच्या तवग गावातील  दुर्गादेवी मंदिर उदघाटन  कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी दादांनी वेळ काढला पण सीमाप्रश्नासाठी समिती नेत्यांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना देण्यासाठी बेळगावला यायला वेळ काढला नाही. यामुळे सिमावासीय जनताही त्यांच्यावर नाराज झाली होती.

 belgaum

एकीकडे गेली 61 वर्षी बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड मराठी भाषिक एकीनेच रहातच आहेत, अशात भाषाभेद कसला करता सीमा वाद असला तरी एकीने सौहार्दाने राहावं असा सल्ला देणाऱ्या दादांनी आपण  सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री आहोत याचेही भान न ठेवल्याने शिवसेना, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, मध्यवर्ती म ए समिती तसेच सीमाभागातील युवामंच सारख्या संस्थांनी त्यांचा कडाडून विरोध केला.
सध्या कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांत दादांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत आळवले पण सीमाभागात याच कन्नड लाठ्या खाऊन मराठीजन विव्हळत आहेत याची जाण त्यांना ठेवली नाही.याचे पडसाद सर्वत्र उठल्याने दादांनी आता तो मी नव्हेच असा मार्ग स्वीकारला असून यामुळे संतापात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.
आजवर भाजपने केवळ राजकीय स्वार्थ बघितला आहे. महाराष्ट्रात सीमावासीयांच्या बाजूने आणि कर्नाटकात कन्नडीगांच्या प्रचाराला असे त्यांचे गणित आहे, या भाजपने मराठीचा विचार करावा अन्यथा सिमावासीय भडकला तर महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घुसून विरोधी प्रचार केला जाईल असा इशारा देण्याची वेळ आली आहे.

दादा म्हणाले…
दादा यांनी बेळगाव live शी बोलतांना आपण आपला सुरक्षा रक्षक यल्लप्पा याच्या आमंत्रणावरून तवग या गावी गेलो होतो असे सांगितले, आपण ग्रामविकास व इतर मुद्द्यांवर बरच काही बोललो पण ते सारे मुद्दे न घेता त्या कन्नड गाण्यावर इतका घोळ घालण्यात आला असेही म्हणाले, आपण दुर्गादेवी मंदिराच्या वास्तू शांतीस गेलो होतो तिथे आपण दुर्गास्तुती म्हटली आणि असे विपरीत झाले असे सांगताना आपण माफी मागतो असे उदगार मात्र त्यांच्या तोंडून आले नाहीत.

का भडकले सिमावासीय?
दादांनी जे गाणे गायले आणि त्यानंतर भाषावाद करू नका असे सल्ले दिले ते गीत कन्नड दुराभिमानी अभिनेते कै राजकुमार यांचे आहे. त्या व्यक्तीने आयुष्यभर मराठीचा दुस्वास केला, आणि त्याच्याच अनधिकृत कन्नड ध्वजाची परवानगी आज कर्नाटक मागत आहे, असे असताना सीमाभागाचे प्रभारी दादांनी भान न बाळगल्यानेच सिमावासीय भडकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.