Saturday, April 20, 2024

/

स्त्रिया आणि कंबरदुखी

 belgaum

sonali sarnobat
“कामानं अगदी मेले गं ! कंबरडे अगदी मोडून गेलेय ! ” अशा आशयाचे उदगार लग्न, मुंजी, समारंभ, सण इत्यादी कार्यक्रमानंतर घराघरातून नेहमी ऐकू येतात. पण बरंच काम न पडताही कंबर दुखीनं त्रासून गेलेल्या स्त्रिया घरोघरी आढळतात, विशेषकरून पाळीच्यावेळी, गर्भारपणात किंव बाळंतपणानंतर कंबर दुखणे म्हणून औषधपाणी घेणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण बरंच आहे. अर्थात डॉक्टरकडून तपासणी करून औषधपाणी करणे हे प्रत्येक स्त्रीच्या कंबर दुखण्याच्या तीव्रतेवर, सहनशक्तीवर व इतर सोईवर अवलंबून असतं. आयुष्यात कधीच कंबर दुखली नाही अशी स्त्री शोधून मिळणं खरंच कठीण आहे.
कंबरदुखी व स्त्रीरोग
स्त्रियांच्यात असणारी कंबरदुखी ही स्त्रीरोगाशी संबंधित असते असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण _
(१) कंबर दुखी प्रमाण पुरुषपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतं.
(२) कंबरदुखी पाळीच्या आधी व पाळीत जास्त असते.
(३) हे दुखणे सहसा गर्भारपणापासून किंवा बाळंतपणापासून सुरू होते.
कंबरदुखीची कारणे
(१) लक्षण म्हणून
(२) स्त्रीरोग
(३) अस्थीरोग
(४) इतर कारणे
लक्षण म्हणून कंबरदुखी
गर्भाशयाच्या आकुंचनाने पाळीच्या वेळी अॅबॉर्शन किंवा बाळंतपणात कंबर दुखू लागते. यावेली गर्भाशयाची आकुंचने वाढलेली असतात. यामध्ये पोटदुखीबरोबर कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.
गर्भारपण व बाळंतपणातील कंबरदुखी
गर्भारपणामध्ये पोटाचा भाग खूपच पुढे आलेला असतो. त्या पोटाच्या मणक्यांच्या स्नायूवर ताण बसतो (Lordosis) तसेच गर्भारपणात निर्माण होणारे अतःस्त्रावामुळे लिगेंमेंटसमध्ये असणारा ताण कमी होतो. बाळंतपणात कंबरेची हाडे व माकडहाड यात बरच सैलपणा आलेला असतो. बाळंतपणानंतर पूर्वीची स्थिती होण्यासाठी काही काळ जावा लागतो. परंतु यामुळे गर्भारपण व बाळंतपण यामध्ये कंबरदुखीचे प्रमाण जास्त आढळते.
स्त्रीरोग
या रोगामुळे निर्माण होणारी कंबरदुखी ही कंबर व कंबरेच्या खालच्या बाजूस मधोमध असते.
(१) गर्भाशय योनीतून बाहेर येणे
यालाच अंग बाहेर येणे असे म्हणतात. गर्भाशय नेहमीच्या जागेवर ठेवणाऱ्या पेशीवर (लिंगेमेंटस्वर ) ताण पडतो व त्यातून कंबर दुखी सुरू होते. परंतु ही कंबरदुखी विश्रांती घेतल्यानंतर किंवा झोपल्यावर कमी होते.
(२) गर्भाशयाची पिशवी पालथि असणे :
यानेसुद्धा हे दुखणे सुरू होते. परंतु प्रत्येक पालथी पिशवी असलेल्या स्त्रीस कंबरदुखी असेलच असे नाही.
(३) पिशवीच्या तोंडास सूज येणे:
सामान्यपणे हे दुखणं बाळंतपणानंतर किंवा अॅबॉर्शननंतर सुरू होते. ही सूज गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडापुरती मर्यादीत न राहता कडेच्या पेशीपर्यंत पोहचली , तरी हे दुखणे जास्त वाढते.
(४) गर्भाशयाच्या कडेच्या पेशींना सूज येणे :
गर्भाशयाकडे रक्ताचा पुरवठा वाढणे, किंवा जंतूंचा प्रादुर्भाव होणे यानेही कंबरदुखी सुरू होते. ही कंबरदुखी पाळीच्या आधी वाढते.
(५) एन्डोमेट्रीओसिस :
गर्भाशयाच्या आत दर अम्हिन्याला वाढणारे आवरण इतर ठिकाणी वाढून संवेदनक्षम मज्जातंतूवर दाब आणते. त्यामुळे दर महिन्याच्य पाळीच्या आधी व पाळीत कंबरदुखी खूपच वाढते.
(६) पोटात वाढणारा ट्यूमर :
पोटात मोठा ट्यूमर असेल तर पाठीच्या कण्याला आधार देणाऱ्या स्नायूंवर ताण पडतो व त्यातून सारखी कंबरदुखी सुरू होते.
(७) कॅन्सर :
हा रोग गर्भाशयाच्या पिशवीच्या कडेला पसरलेला असेल किंवा संवेदनाक्षम मज्जातंतू कॅन्सरमुळे वेढले गेले असतील तर असह्य कंबरदुखी होते.
अस्थीरोग
(१) मणक्याचे स्नायू व लिगेंमेट्स यामध्ये असणारी शिथीलता
(२) दोन मणक्यामध्ये असणारी कुर्चा सरकून कंबरदुखी सुरू होऊ शकते.
(३) मणक्याचे रोग : संधिवात, टी.बी. कॅन्सरचा प्रादुर्भाव इत्यादी रोगांचे लक्षणं म्हणून कंबरदुखी सुरू होते.
इतर कारणे
(१) मूत्रवाहिनी व किडनी यांच्या रोगांनी कंबरदुखी सुरू होते, परंतु त्याचे स्थान व लक्षणे बरीच वेगळी असतात. म्हणून त्याचे रोग ओळखणे सोपे जाते.
(२) मानसिक ताण : काही वेळा कोणतेच कारण आढळून येत नाही. कंबरदुखीचे कारण मानसिक दुर्बलता किंवा विषण्णता असू शकते.
कंबरदुखी निर्माण होऊ नये म्हणून काय करावे.?
(१) कामात बदल व दोन कामात विश्रांती
कामाचा ताण पाठीच्या स्नायूंना, लिगेंमेंट्स व मणके यांना त्रास होईल असे वाकून काम करणे या प्रमुख गोष्टी कंबरदुखीस कारणीभूत असतात. कारणे टाळणेसाठी कामाच्या स्वरूपात बदल करावा. स्वयंपाक, पान मांडणे, वाढणे, केरवारे, धुणे ही कामे वाकून न करता बसून करावीत. यामुळे पाठीवर पडणारा ताण खूपच कमी होईल. तसेच सर्व कामे दिवसाच्या तासामध्ये वाटून घेतल्यास एकाच वेळी एकदम पडणारा ताण एकाचवेळी न पडता संबंध दिवसात विभागून जाईल. तसेच दोन कामांच्यामध्ये थोडी विश्रांती घेतल्यास सर्वच अवयवांना विश्रांती मिळते व झालेली झीज भरून काढणेसाठी अवसर मिळतो. म्हनून योग्य तऱ्हेने कामात बदल कामाची सबंध दिवसात वाटणी व योग्य विश्रांती ही त्रिकुटी कंबर दुखी न होण्यासाठी उपयोगी पडते.
(२) आहार :
योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात )
(३) व्यायाम :
शरीरातील स्नायूंना व्यायामांची पुष्टी मिळते व त्यातील ताकद वाढते. त्यामुळे सांध्यांच्या हालचली नीट होतात. त्याचबरोबर जादा वाढणारी चरबी कमी होणे महत्त्वाचे असते. वजन जास्त असेल तर वयाबरोबर जीर्ण होणाऱ्या सांध्यांना हे वजन पेलवत नाही व सांधेदुखी, गुढघेदुखी, कंबरदुखी हे विकार सुरू होतात. अर्थात घेतला जाणारा व्यायाम नियमीत असावा. चक्रासनानी विशेषकरून कंबरदुखी नाहीशी होते.
पाळीच्या वेळी, गर्भारपणात व बाळंतपणात कंबर दुखणे इ. बहुतेक स्त्रियांच्यात आढळते. पाळीच्या वेळी, तसेच बाळंतपणातील कंबरदुखी ही गर्भाशयाच्या आकुंचनामुळे असते. तसेच गर्भारपणात पोटातील वाढणाऱ्या गर्भामुळे मणक्यावर ताण येतो. या अवस्थेतील कंबरदुखीसाठी खास उपाय नाहीत. योग्य आहार, विहार, विश्रांती घेतली म्हणजे कंबरदुखी कमी होते.
इतर वेळेस सातत्याने कंबरदूखी असेल तर वरील दिलेली कारणे हुडकणे जरूरीचे असते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे एखादा प्राणघातक रोग दुर्लक्षित जात नाही. म्हातारपणी कंबरदुखी असेल तर म्हातारपणामूळेच ही व्याधी आहे अशी समजूत करून घरी बसू नये. या उलट डॉक्टरांनी तपासणी केल्यास कॅन्सरसारख्या रोगांचे लवकर निदान होऊन उपाय योजनाही करता येते.
कंबरदुखी सुरू झाल्यावर उपाय करण्यापेक्षा कंबरदुखी सुरूच होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मोठा कोणताही रोग नसल्याची खात्री करून घेतल्यावर असणाऱ्या कंबरदुखीवर योग्य उपचार करावेत. तसेच एखाद्या रोगामुळे जर कंबरदुखी असेल तर त्यावर योग्यवेळी उपचार करावेत, म्हणजे स्त्रियांच्या कंबरदुखीबरोबरच घरातील पुरुषांची डोकेदुखी थांबेल !
होमिओपॅथी-
या उपचारांनी कंबरदुखी पूर्णत: बरी होते . परंतु तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक08312431362

सरनोबत क्लिनिक 08312431364

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.