बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या दरवाढीच्या धोरणाचा निषेध करत गोकाक शहर आणि ग्रामीण भाजप मंडळांच्या वतीने आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य आंदोलन करण्यात आले.
आमदारांच्या गृहकार्यालय परिसरात जमलेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.
त्यानंतर बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक अमरनाथ जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढत बसवेश्वर चौक गाठला. येथे मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी बसभाडे, दूध, धान्य यांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून, महागाई नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. लक्ष्मण तपसी आणि शशिधर देमशेट्टी यांनीही सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
वाढवलेले दर तातडीने मागे घेण्याची मागणी करत गोकाक ग्रेड-२ तहसीलदार एस. एस. रामदुर्ग यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.




